भूकंपसदृश धक्क्यांनी नगर जिल्हा हादरला

नगर शहरातील केडगावसह राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांतील वारी कान्हेगाव व पंचक्रोशीमध्ये मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भूकंपसदृश सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नाशिकमधील भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसून, नागरिकांनी घाबरून न जाता अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

श्रीरामपूर शहरातील ऐनतपूर परिसर, इंदिरानगर, बेलापूर, उक्कलगाव, एकलहरे, टिळकनगर, रांजणखोल, राहुरी शहर, परिसर तसेच राहात्यातील ममदापूरसह अन्य काही गावांत काल रात्री 9 ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले. त्यामुळे भूकंपाची चर्चा सुरू झाली; पण हे भूकंपाचे धक्के नाहीतर के के रेंजमध्ये लष्कराचा सराव सुरू असल्याने त्याची कंपनं जाणवल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव, खडकेवाके तसेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, रांजणगाव देशमुख, सोनेवाडी, जेऊर या ठिकाणीही धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नगरच्या भूजल सर्वेक्षणचे अधिकारी अतुल काटकर यांना पाचारण केले असता काटकर यांनी परिसराची बारकाईने पाहणी करून नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. पावसाळ्यात भूस्तरावरील भेगांमध्ये पाण्याबरोबर हवा जाते. पावसाळा संपल्यावर ही हवा जास्त दाबाने भूस्तरातून वर येत असल्याने हे धक्के जाणवत असावेत, असे काटकर यांनी सांगितले होते.

दरम्यान, नाशिकला मंगळवारी तासाभरात तीन भूकंपाचे धक्के बसले. नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटरावर दिंडोरी तालुका हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नगर जिह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री घरांना हादरा बसल्याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भूकंपमापन केंद्र, मेरी, नाशिक येथील अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.