नगर शहर बँकेत 17, तर ‘नागेबाबा’त 50 तोळ्यांचे सोने बनावट

शहरातील बनावट सोनेतारण घोटाळ्याचे शेपूट लांबतच असून, रोज नवनव्या कर्ज खात्यांमधून बनावट सोनेतारण ठेवून कर्ज घेतल्याचे समोर येत आहे. आजही शहर सहकारी बँकेतील एका खात्यातून 17 तोळे, तर नागेबाबा पतसंस्थेतील नऊ खात्यांमधून 50 तोळ्यांचे सोन्याचे दागिने बनावट असल्याचे आढळले आहेत. आजच्या तपासणीत 22 लाखांचे दागिने बनावट असल्याचे उघड झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी दिली आहे. दरम्यान, बँकेच्या अधिकारी वा पदाधिकाऱ्यांना या बनावट सोनेतारण प्रकरणाची कल्पना होती की नव्हती, असा सवाल उपस्थित होत आहे.

नगर शहरामध्ये बनावट सोनेतारण घोटाळ्याचे रॅकेट प्रचंड मोठे असल्याचे रोजच आढळून येणाऱ्या बनावट दागिन्यांच्या आकडेवारीवरून उघड होत आहे. शहर सहकारी बँकेमध्ये बनावट सोनेतारण प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी शहरातील पाच पतसंस्थांना पत्र देऊन सोनेतारण कर्जप्रकरणांची माहिती मागवली होती. यातील केवळ नागेबाबा पतसंस्थेनेच पोलिसांना माहिती दिली होती. नागेबाबा पतसंस्थेतील सोनेतारण कर्जप्रकरणाची पोलिसांकडून गेल्या आठ दिवसांपासून तपासणी सुरूच आहे. बँकेतून आत्तापर्यंत आठ किलो बनावट सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे, तर शहर सहकारी बँकेतील सोनेतारण कर्जखात्यांचीही पोलिसांकडून तपासणी सुरूच आहे. आज केलेल्या तपासणीत शहर सहकारी बँकेतील एका खात्यात पाच लाख 71 हजार रुपयांचे 17 तोळे बनावट सोने आढळले आहे, तर नागेबाबा पतसंस्थेमध्ये 9 खात्यांची तपासणी करून त्यातून 16 लाख 86 हजार रुपयांचे 50 तोळ्यांचे दागिने बनावट असल्याचे समोर आले आहे.

अन्य चार पतसंस्थांकडून पोलिसांना अद्यापि कोणतीही माहिती मिळालेली नाही. दोनच बँकांमधून आजवर मोठय़ा प्रमाणावर बनावट दागिने आढळले असून, या रॅकेटमध्ये कुणाचा समावेश आहे, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.