ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नगर जिह्यात पाच दिवस ‘ड्राय डे’

38

सामना ऑनलाईन, नगर

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बनावट दारूचे प्राशन केल्यामुळे १२ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. या घटनेचा धसका घेत जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील दारूची दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, शहरातील लीकर असोसिएशनच्या सदस्यांनी उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांची भेट घेऊन सलग पाच दिवस मद्यविक्री बंद न ठेवता, शहर हद्दीला यातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जिह्यात बनावट दारूचा विषय सातत्याने गाजत आहे. अनेकदा कारवाई होऊनही बनावट दारूचे समूळ उच्चाटन होऊ शकले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान बनावट दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. सध्या जिह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, २०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या निवडणुका होणार आहेत. आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. पांगरमल दारू प्रकरण ताजे असताना प्रशासनाने त्याचा चांगलाच धसका घेतला असून, तोंडी आदेशामुळे पाच दिवस सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने व परवाना कक्ष हॉटेल, बीयरबार, ताडीविक्री केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर पांगरमल घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पाच दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामपंचायत भागात निवडणुका होत असल्यामुळे शहरातील मद्यविक्रेत्यांवर अन्याय होणार असल्याचे म्हणत लीकर असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नवलकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पाच महिने आमचा व्यवसाय बंद होता. त्यापाठोपाठ श्रावण व नवरात्रउत्सव झाल्याने आमच्या व्यवसायवर परिणाम झालेला आहे. अधिकृत व्यवसाय करणाऱयांवर यामुळे अन्याय होणार आहे. त्यामुळे या आदेशातून आम्हाला सवलत मिळावी, असे असोसिएशनचे राजेंद्र ससे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या