शहरासाठी 167 कोटी खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कला वर्षाकाठी 10 लाख पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे. पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण असलेल्या या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर सुधारित विकास आराखड्यामध्ये स्मशानभूमीचे नियोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिटमिटा येथील शंभर एकर जागेवर होणाऱ्या सफारी पार्कलगत 30 मीटर रुंदीच्या रस्त्यावर स्मशानभूमी, त्यानंतर पार्किंग आणि भाजी मंडई प्रस्तावित करण्यात आली आहे. या आधी इथे पार्ककरिता आरक्षण होते, जे शहरातील विविध भागातून रहिवासी क्षेत्राकरिता आरक्षण रद्द करून या ठिकाणी अॅडजस्ट करण्यात आल्याचे दिसत आहे. सफारी पार्कच्या आतमध्ये 8 एकर जागा पार्किंगसाठी असताना प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर अजून एक पार्किंगचा प्रस्ताव करण्यात आला आहे आणि तीनशे मीटरच्या अंतरावर दोन भाजीमंडई असताना अजून एक भाजीमंडईचा प्रस्ताव तर अनाकलनीय आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्वात मोठ्या प्रकल्पाजवळील असा नियोजनशून्य प्रस्ताव हाणून पाडला पाहिजे. वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, खुलताबाद अश्या पर्यटन कॉरिडॉरजवळ असणारा हा प्रकल्प ‘विशेष पर्यटन विकास क्षेत्र’ म्हणून विकसित करावा, या करिता छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, अर्बन रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने यावर उपाय सादर करण्यात येणार आहे.