नगर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये असलेल्या सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 367 सोसायटी या संगणकीकृत झालेल्या आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात राज्यामध्ये नगर जिल्हा आघाडीवर आहे.
केंद्र सरकारने गावातील सोसायट्या संगणकीकृत करण्यासाठी योजना सुरू केली आहे. देशांमधील तीन ते चार राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वाधिक मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये 1395 कार्यकारी सोसायट्या आहेत. यापैकी आतापर्यंत 367 सोसायट्यांची कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित 946 सोसायट्या पूर्ण करण्याचे उद्धीष्ट असून त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. संगमनेर, पारनेर, अकोले आणि जामखेड या तालुक्यांच्या सोसायटीची कामे हाती घेण्यात आली होती. संबंधित सोसायटीच्या सचिवाने दररोज होणाऱ्या व्यवहारांची या ठिकाणी नोंदणी करायची आहे. सोसायट्यांचा कारभार पारदर्शकपणे चालावा या उद्देशाने हा प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकार जो निधी देते तो इंटलेट व इन्फज या कंपनीद्वारे त्यांचे काम हे नाबार्डमार्फत सुरू केलेले आहे. तसेच नगर जिल्ह्यामध्ये एजन्सीला हे काम देण्यात आलेले आहे. जिल्हा सहकारी बँकेने अशा काही सोसायट्यांना इंटरनेटचे डोंगल व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे ती सोसायटी संगणकीकृत करण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाले. साधारणतः या वर्षाखेरीस ही सर्व कामे पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांचा जो कारभार आहे, तो आता चांगल्या पद्धतीने संगणकीकृत केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची ही योजना अतिशय महत्त्वाची योजना असून ती वेळेमध्ये कशा पद्धतीने पूर्ण होईल याची आम्ही योग्य पद्धतीने दखल घेत आहोत. आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 364 सोसायट्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. अनेक अडचणी होत्या, त्यावर मात करत याचे कामकाज सुरू आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोसायट्या असल्यामुळे हे काम प्रगतीपथावर असल्याचे, नगरचे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी यावेळी सांगितले. आगामी काळामध्ये उर्वरित संस्थांचे काम पूर्ण झाल्यानंतर या संस्था या संबंधित तालुक्याच्या बँकांना जोडल्या जातील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा बँकांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.