उघड्यावर मांस विक्री; मनपा लावणार जबर दंड

शहरात गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर सर्रासपणे उघड्यावर बेकायदा मांस विक्री सुरू आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना दिसेल असे मांस लटकावणे, दुकानाच्या बाहेर कोंबड्या, बकरे ठेवल्यास मोठा दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कारवाई करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सर्रास विनापरवाना मांसविक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. अनेक जण रस्त्याच्या बाजूला तात्पुरती ताडपत्री टाकून मांसविक्री करतात. अशा बेकायदा मांसविक्रीमुळे परिसरात दुर्गंधी पसरते. न्यायालयाने अशा प्रकारे मांस विक्री करण्यास बंदी घातली आहे. महापालिकेकडून परवाना घेऊन मांस विक्री करणारे दुकानदार देखील नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना दिसेल असे मांस लटकवून ठेवतात. तसेच रस्त्यावरच बकरे, कोंबड्यांचे पिंजरे ठेवतात. अशा प्रकाराला चाप लावण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने परवाना व दंडाची रक्कम वाढविली आहे. एक सप्टेंबरपासून नव्या दंडानुसार कारवाई केली जाणार आहे.

दोन पथकांची नेमणूक
शहरात विनापरवाना उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने सकाळी 6 ते दुपारी एक व दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेत कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. त्यात पशुसंवर्धन पर्यवेक्षक, सुरक्षारक्षक, महिला सुरक्षारक्षक, मजूर आणि वाहनचालक यांचा समावेश आहे.

शुल्क व दंड असा राहणार
मांस विक्री परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क-1500 रु.
उशिरा नूतनीकरण परवाना शुल्क प्रतिमाह दंड-100 रु.
कत्तलखान्याव्यतिरिक्त कत्तल केल्यास – 2000 रु.
उघड्यावर मांस विक्री दंड- 1000 रु.
विना ना-हरकत प्रमाणपत्र मांसविक्री केल्यास दंड- 2000 रु.