बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अमानुष अत्याचार करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. असे असतानाच चॉकलेटचे अमिष दाखवून मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे.
सदर घटना पाथर्डी शहरातील लकार गल्ली विभागात घडली आहे. संध्याकाळच्या वेळेस लहान मुले खेळत असताना त्या ठिकाणी दोन तरूण दुचाकीवरुन आले व त्यांनी मुलांना चॉकलेट देत गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र मुलांनी सतर्कता दाखवत त्यांना स्पष्ट नकार दिला आणि घराच्या दिशेने पळाले. घरी आल्यानंतर मुलांनी आपल्या पालकांना सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर घाबरलेल्या पालकांनी तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तरूण तोपर्यंत पसार झाले होते. या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सदर्भात डॉ. सुहास उरणकर, सचिन पाटसकर, नारायण बोरुडे, अभय गांधी, प्रकाश बोरुडे, नानासाहेब पालवे, नितीन उरणकर आणि सतिश लबडे यांनी पोलिसांना निवेदन देत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.