गडचिरोली – नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची जबरदस्त मुसंडी

नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातून शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. पूर्वी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकच नगरसेवक होता, मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारत 14 नगरसेवक निवडून आणले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढल्याने शिवसेना जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी आनंद व्यक्त केला आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून शिवनेनेच्या यशाची कमान उत्तरोत्तर वाढत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी पांडव यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेपूर्वी मुलचेरा नगरपंचायतीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या मोहना देविदास परवाके आणि विजय माधव कुळमेथे या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विजय थोडक्यात हुकले

यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी शिवसेनेचा विजय अगदी थोडक्यात हुकला. भामरागड नगरपंचायतीत नागेश मदलवार व व्यंकटी इष्टाम या दोन्ही उमेदवारांना विरोधी उमेदवाराइतकीच मते मिळाली होती, मात्र ईश्वर चिठ्ठी काढून इथे निकाल लागल्याने हे दोघे पराभूत झाले. खुशाली मडावी यांचा 4 मतांनी, बेबी सहमेक यांचा 6 मतांनी तर देवा चौधरी यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. या पाच जागी जर शिवसेना उमेदवार निवडून आले असते तर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या आणखीन वाढली असती असे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी सांगितले.

मूलचेरा नगरपंचायतीत शिवसेनेचे 6 उमेदवार विजयी

गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून आलेत. विकास नैताम, काशिनाथ कन्नाके, सुनीता कोकेरवार, यामीना हिवरकर या चौघांनी विजय मिळवला आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विजय कुळमेथे आणि मोहना परवाके यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याने शिवसेनेच्या मूलचेरा नगर पंचायतीमधील नगरसेवकांची संख्या 6 झाली आहे.