प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग घटला

नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा सहभाग घटला आहे. खरीप व रब्बी हंगामात मिळून गेल्या वर्षी 7 लाख 32 हजार 48 शेतकऱ्यांनी 4 लाख 61 हजार 987 हेक्टरवर विमा उतरवला होता. या तुलनेत यंदा शेतकरी संख्या दीड लाखाने घटली असून, 1 लाख 37 हजार 14 हेक्टरने क्षेत्रही घटले आहे.

विशेष म्हणजे वेगवेगळ्या कारणाने यंदा शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पीकविम्याची जनजागृती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याविषयीची कृषी विभागावर जबाबदारी आहे. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मागील वर्षभरात पीकविम्याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्याचा परिणाम शेतकरी सहभागावर झाल्याचे दिसत आहे.

अवेळी तसेच अतिपाऊस, गारपीट, यांसह नैसर्गिक संकटाने शेतीपिकांचे नुकसान झाले, तर शासनाला मदत द्यावी लागते. अनेकवेळा होणारे नुकसान मोठय़ा प्रमाणात असल्याने मदत देण्यात अडचणी येतात. त्यामुळे शासनाने खरीप, रब्बी पिके, फळबागांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. या योजनेते शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घ्यावा, यासाठी कृषी विभाग व लोकप्रतिनिधींकडून जनजागृती होत आहे. गेल्या वर्षभरात मात्र पीकविम्याबाबत येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालच गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. पीकविम्याबाबत जनजागृतीही झाली नाही आणि शेतकरी संवादही झाला नाही. त्याचा परिणाम थेट सहभागावर झाल्याचे दिसून आले आहे.

पीकविम्याची स्थिती (कंसात गतवर्षीची स्थिती)

खरीप हंगाम

शेतकरी सहभाग : 4 लाख 66 हजार 245 (गेल्यावर्षी 5 लाख 96 हजार 130)

हेक्टर क्षेत्र : 2 लाख 49 हजार 484 (3 लाख 89 हजार 774)

विमा संरक्षित रक्कम : 744 कोटी 99 लाख (987 कोटी 95 लाख)

शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता : 17 कोटी 65 (25 कोटी 27 लाख)

रब्बी हंगाम

शेतकरी सहभाग : 1 लाख 19 हजार 521 (1 लाख 35 हजार 918)

हेक्टर क्षेत्र : 65 हजार 488 (72 हजार 913)

विमा संरक्षित रक्कम : 231 कोटी 42 लाख (206 कोटी 9 लाख)

शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता : 5 कोटी 9 लाख (4 कोटी)

आपली प्रतिक्रिया द्या