नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण – फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी संस्थेची नियुक्ती

नगर अर्बन बँकेतील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासात जप्त केलेल्या कागदपत्रांचे व तपासात समोर आलेल्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच फॉरेन्सिक ऑडिटचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूकप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी यांनी सुमारे 28 संशयित कर्ज खात्यांबाबत माहिती देऊन सुमारे 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. उपअधीक्षक कमलाकर जाधव याचा तपास करीत आहेत. तपासात प्राप्त झालेल्या सर्व कागदपत्रांचे व खात्यांमधील व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी काही संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

प्राप्त झालेल्या तीन प्रस्तावांपैकी एका संस्थेची नेमणूक फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. लवकरच याचा तपास व ऑडिट पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तपासादरम्यान बँकेकडून थकीत असलेल्या कर्जप्रकरणांची माहिती व कागदपत्रे, फायली तपासासाठी जप्त केल्या आहेत.

तपासादरम्यान कर्ज घेण्यात आलेल्या रकमांचा वापर इतर कर्जांच्या थकीत रकमा भरण्यासाठी झाल्याचे समोर आले होते. तसेच ज्या कारणांसाठी कर्ज घेण्यात आले आहे, त्याऐवजी कर्जाच्या रकमेच्या बेकायदेशीरपणे इतरत्र वापर करण्यात आला. काही रकमा इतरांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.