नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण ,अटकेतील तत्कालीन संचालकांना पोलीस कोठडी

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड (जि. पुणे) शाखेतील 22 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे नगर शहरात छापा टाकून बँकेच्या एका तत्कालीन संचालकाला व इतर एकास अटक केली होती. त्यांना आज न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवनीत सुरपुरिया व यज्ञेश चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेची 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवड येथील बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला होता. याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

या कर्जघोटाळ्यात नगर अर्बन बँकेचे माजी संचालक व अधिकारी सामील असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह त्यांच्या पथकाने काल नगर शहरामध्ये धडक कारवाई सुरू केली होती. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर माजी संचालक मात्र नगरमधून फरार झाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या