स्मृतिगंध : माणूसलोभी लेखक

>>प्रा. मिलिंद जोशी

मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच निधन झाले. व्यासंगी, उपप्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. नवलेखकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात ते नेहमी अग्रेसर होते. दर्जेदार वाडमय निर्मितीसोबतच त्यांचं माणूसलोभी असणं कायम लक्षात राहील.

संवेदनशील आणि समाजाभिमुख साहित्यिकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे साहित्यिक, समीक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि वाङ्मयीन कार्यकर्ते अशा विविध रूपात वावरले. संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी मानणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे शिक्षण, साहित्य आणि संस्थात्मक कार्य या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली. त्यांनी काही काळ बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रथम अधिव्याख्याता आणि नंतर प्रपाठक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत होते. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. व्यासंगी, अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते हे त्यांनी स्वतः अनुभवले होते म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील गरजू मुलांना अनेक प्रकारे मदत केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले. ते कुलगुरु असताना त्यांनी कॉपीमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र इतके प्रभावी होते की अनेक विद्यार्थ्यांनी कॉपी न करण्याचा निर्णय घेतला. शिस्तीशी तडजोड न करता विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

डॉ. कोत्तापल्ले यांनी एमए करण्यासाठी औरंगाबाद येथे विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेत अर्धवेळ कारकुनीची नोकरी मिळवून दिली. तिथे ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून डॉ. सुधीर रसाळ कार्यरत होते. तिथे त्यांचा तसेच प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. गंगाधर पानतावणे यांचा सहवास त्यांना लाभला, त्यातून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडले. पुढे ते मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षही झाले. साहित्य संस्थांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे त्यांनी साहित्य संस्था आणि कार्यकर्ते यांच्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पहिले. कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी असतात आणि त्या सुसंवादाने दूर करता येतात यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

डॉ. कोत्तापल्ले सरांनी कविता, कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारात आपल्या लेखणीचा ठसा उमटविला. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरातून निर्माण होणारे सांस्कृतिक संघर्ष त्यांच्या लेखनाच्या पेंद्रस्थानी होते. त्यातूनच समकालीन समाजजीवनाचे अतिशय प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून केले. त्यांनी समीक्षा लेखन करताना कधीही गट-तट निर्माण केले नाहीत. समीक्षाधर्माचे निष्ठsने आचरण करताना त्यांनी कधीही दुय्यम दर्जाच्या कलाकृतींची खोटी स्तुती केली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीतील कृतिशील विचारवंत अशीच त्यांची ओळख होती. ग्रामीण भागातील लेखकांची कधी त्यांना मार्गदर्शन करून, कधी त्यांच्या पुस्तकांना प्रस्तावना देऊन तर कधी समीक्षालेख लिहून त्यांनी कायम पाठराखण केली. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागातील लेखकांचा आधारवडच कोसळला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील कोसळणीच्या कथा आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडणाऱया कोत्तापल्ले सरांनी ‘मानवी शोषणाच्या विरोधी भूमिका घेणे हे लेखकाचे काम असते, निव्वळ वास्तव चित्रण करणे नव्हे,’ हे ठामपणे सांगितले. या समाजाभिमुख लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह सर्व बहुमान समाजाने दिले. डॉ. कोत्तापल्ले यांनीही ते विनयाने आणि कृतज्ञतेने स्वीकारले. त्यांच्या जाण्याने लेखनात, सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात माणसाला सर्वोच्च प्राधान्य देणारा एक माणूसलोभी महत्त्वाचा लेखक साहित्यविश्वाने गमावला आहे.

[email protected]
(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत)