ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ना.वि.देशपांडे यांचे निधन

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष, ग्रंथमित्र नागोराव विठ्ठलराव उर्फ ना. वि. देशपांडे यांचे मंगळवारी (दि.24 मार्च)च्या मध्यरात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मूळ परतूर (जि. जालना) येथील रहिवासी असलेल्या ना. वि. देशपांडे यांचा जन्म 24 एप्रिल 1931 रोजी झाला होता. हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांनी रझाकारांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सत्याग्रह केले. हैदराबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियलचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राचे संस्थापक सचिव आणि मराठवाडा जनता विकास परिषदेचेही ते संस्थापक सचिव होते. ग्रंथपाल सोसायटी आणि आणि खादी ग्रामोद्योग समितीत ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन केंद्राचे कोषाध्यक्ष आणि जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामी जन्मस्थान मंदिराचे विश्वस्त सुरेश देशपांडे, सुधीर देशपांडे आणि सुहास देशपांडे यांचे ते वडील होत.

आपली प्रतिक्रिया द्या