खोके सरकारला घेऊन जा गे, ‘मारबत’! नागपूरच्या उत्सवात नागरिकांचे साकडे

नागपूरचे सांस्कृतिक वैभव असलेला आणि 144 वर्षांची परंपरा  असलेल्या मारबत उत्सवाला आज नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवाच्या निमित्ताने ‘अन्यायकारी  खोके सरकारला घेऊन जा गे मारबत’ असे साकडे नागरिकांनी मारबतला घातले. शिवरायांचा अवमान करणारे आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला ताबडतोब घेऊन जा, असे साकडेच नागरिकांनी मारबतला घातले.

पिवळी मारबत आणि काळी मारबत अशा दोन मारबतची नागपूरमध्ये मोठी भव्य मिरवणूक काढली जाते. काळ्या-पिवळ्या मारबतीचे मिलन हे विशेष आकर्षण असते. आजच्या यात्रेत ‘खोके सरकारला घेऊन जा गे मारबत’ या घाषणेने नागपूर दुमदुमून गेले होते. युवकांना बेरोजगार करणाऱ्या सरकारला ‘घेऊन जा गे बडग्या’ हा मुद्दा विशेष गाजला. शिवाय बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेचा बडग्या व मारबत काढून निषेध करण्यात आला. तर गोंदिया येथेही भ्रष्टाचारी महायुती सरकारला ‘घेऊन जा..गे.. मारबत. महाराजांचा अनादर करणाऱ्या सरकारला घेऊन जा..गे.. मारबत.’ बदलापूर, अकोल्यातील चिमुकल्या विद्यार्थिनीची रक्षा न करू शकणाऱ्या खोके सरकारला घेऊन ‘जा… गे… मारबत..य.’ अशा आगळ्या वेगळ्या राजकीय घोषणा देत आज गोंदिया जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच एन.एस. यू.आय.च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.