पोलीस उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना अटक, पोलीस विभागात खळबळ

1518

नागपूर आयुक्तालयातील अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधित विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर (वय – ५६) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, याप्रकरणी तक्रारदार हे रेल्वेमध्ये पार्सल ठेकेदारीचे काम करतात. त्यांनी ९ सप्टेंबर २०१९ मध्ये नितीन नारनवरे यांच्याकडून शताब्दी चौक येथे प्लॉट खरेदीचा करारनामा केला होता. या प्लॉटवर गोपालसिंग राजपुत नावाच्या व्यक्तीने कबाडीचे दुकान लावून अतिक्रमण केले होते. परिणामी तक्रारदार हे गोपाल कबाडीवाल्याशी प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात बोलले असता दोघांमध्ये भांडण झाले. याबाबत तक्रारदार यांचेविरूध्द अजनी पोलिसात कलम ४५२, ४४८, ३२३, ४२७, ५०४, १४९, १४३, १४४, १४७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर यांनी तक्रारदाराच्या शताब्दी चौकातील प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्याच्या मोबदला म्हणून ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगीता चाफले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये आरोपी पोलिस उपनिरीक्षक राजेशसिंह केशवसिंग ठाकुर यांनी तक्रारदाराच्या प्लॉटवरील अतिक्रमण काढण्याचा मोबदला म्हणून ३ लाख रुपयांच्या मागणीला तडजोडअंती एक लाख रुपयांची लाच शताब्दी चौक येथे आरोपीने स्विकारली. याप्रकरणी आरोपी राजेशसिंग केशवसिंग ठाकुर यांच्याविरूध्द अजनी पोलीस ठाणे येथे भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक ठाकुर यांच्या घराची झडती सुरु आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगीता चाफले, मोनाली चौधरी, कर्मचारी रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम व वकील शेख यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या