शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना तरूणाला गळफास

26

सामना प्रतिनिधी । नागपूर

रामटेक या ऐतिहासिक गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा सादर करताना तरूणाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. गळफास लागून त्या तरुणाचा मृत्यू झालेला असताना हा चित्ररथ रामटेकच्या गल्ल्यांतून फिरत होता. त्यानंतर ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. मनोज अरुण धुर्वे (२८, रा. संग्रामपूर, ता. रामटेक, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

रामटेक येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत विविध सामाजिक विषयांवरील चित्ररथ साकारले जाऊन समाजाचे प्रतिबिंब त्याद्वारे दर्शविले जाते. अठराभुजा गणेश मंदिरात गणेशाची पाद्यपूजा केल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास या शोभायात्रेला प्रारंभ झाला.

शोभायात्रेत काहींनी जिवंत देखावे तयार केले. त्यापैकीच राजेश सरवर याच्या नेतृत्वात ‘कास्तकाराची आत्महत्या’ या चित्ररथात मनोज धुर्वे हा गळफास लावलेला शेतकरी म्हणून सहभागी झाला होता. बसस्टँडमार्गे शोभायात्रा आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. तेथून पुढे जाऊन गांधी चौकात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयोजकांना शंका येताच त्यांनी मनोजला रुग्णालयात हलविले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या