पती-पत्नीच्या वादात चिमुकलीचा बळी, ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीचा खून

प्रातिनिधिक फोटो

नागपुरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पती-पत्नीच्या वादात चिमुकलीचा बळी गेला आहे. राधिका किशोर सोयाम असे दोन वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. किशोर सोया (वय – 40) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी किशोर हा मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील उमरवही येथील रहिवासी असून तो आपली पत्नी पुजा (वय – 30) आणि दोन वर्षाची मुलगी राधिका हिच्यासह गणेशपूर येथे भाड्याने राहात होता. काही दिवसांपासून पत्नीच्या चात्रित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. तसेच घटस्फोट घेण्याची मागणी करत होता.

सोमवारी सकाळी आरोपीने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दररोजच्या झंझटीला कंटाळून पत्नी पूजा पतीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्थानकात गेली. त्यावेळी घरी आरोपी किशोर आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी राधिका असे दोघेच होते.

पूजा पोलिसात तक्रार देऊन घरी आली असता घरातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन वर्षांची राधिका आणि पती किशोर हे दोघेरी रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते. आजूबाजूच्या लोकांनी आणि पोलिसांनी चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

दरम्यान, आरोपी किशोर याला नागपूर येथे हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या