पुरुष नेत्यांपेक्षा इंदिरा गांधी अधिक कर्तृत्ववान, गडकरींच्या विधानाची जोरदार चर्चा

39

सामना ऑनलाईन। नागपूर

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या पुरुष नेत्यांपेक्षा अधिक कर्तृत्ववान होत्या, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपूर येथे रविवारी एका महिला स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कौतुक केले. भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांना, पंतप्रधानांना कायम लक्ष्य केले जात असताना गडकरी यांनी केलेले विधान महत्वाचे मानले जात आहे.

इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक पुरुष नेत्यांना झुकवले. त्यांनी कधी आरक्षणाचा आधार घेतला का? असा सवाल करत गडकरी यांनी आपल्या ज्ञानाने व कर्तृत्वाने मोठे व्हा असे आवाहनही उपस्थित महिला कार्यकर्त्यांना केले. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचाही उल्लेख केला. तसेच त्यांनी जाती व धर्मावर होणाऱ्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महिलांना आरक्षण मिळावे यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जाती, धर्म, भाषा, व लिंगाच्या आधारावर कोणीही प्रगती करू शकत नाही असेही गडकरी यावेळी म्हणाले.

दरम्यान, गडकरी यांच्या या विधानामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. मोदी सातत्याने इंदिरा गांधी यांच्या धोरणावर टीका करत असून राहुल गांधीही मोदी व भाजपवर हल्लाबोल करत आहेत. अशावेळी गडकरी यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुक करणे भाजप नेतृत्वाला खटकणे साहजिकच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या