नागरिकत्व केवळ अधिकारांपुरतेच मर्यादित नसून कर्तव्यांचाही अंतर्भाव! सरन्यायाधीशांचे परखड मत

856

नागरिकत्व केवळ लोकांच्या अधिकारांपुरतेच मर्यादित नसून समाजाप्रति असलेल्या कर्तव्यांचाही त्यात समावेश आहे, असे परखड मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले. देशात नागरिकत्व कायद्यावरून काहूर माजलेले असताना सरन्यायाधीशांनी नागरिकत्वाची केलेली व्याख्या लोकांना अधिकारांबरोबरच कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 107 व्या दीक्षांन्त सोहळ्याला सरन्यायाधीश शरद बोबडे प्रमुख पहुणे म्हणून उपस्थित होते त्याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक संस्था प्रचंड व्यावसायिक झाल्या आहेत. शिक्षणाच्या या बाजारीकरणाचा आपण स्वतः अनुभव घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठीय शिक्षणाचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे. विद्यापीठे हे केवळ दगडमातीच्या इमारती नव्हेत, तसेच एखादे उत्पादन तयार करणारा कारखानाही ठरू नये, अशी अपेक्षा बोबडे यांनी व्यक्त केली. विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याची ताकद असायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढतोय

देशभरातील सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये संताप, चीड, असंतोषाचे वातावरण आहे. त्यांना फसविले जात असल्याची त्यांची भावना आहे. पण मुळात शिक्षण ही संकल्पना शिस्त या संकल्पनेशी पूरक आहे. शिस्त नसेल तर शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या दिसत असलेल्या संतापाची गरज नसल्याचे बोबडे यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या