‘हनीट्रॅप’चा दावा करणारा ‘तो’ व्यक्ती भाजपच्या माजी मंत्र्यांचा व्यावसायिक भागीदार – अनिल देशमुख

नागपूरच्या कथित हनीट्रॅप प्रकरणातील ऑडिओ क्लिप प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्या क्लिपमध्ये आवाज असलेला साहिल सय्यद भाजपचा कार्यकर्ता असून तो माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी आमदार सुधाकर देशमुख यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचा उल्लेख अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. तसेच या पत्रामुळे हनीट्रॅप प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण भाजपचे अंतर्गत राजकारण असल्याचे दिसून येते, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांना एक पत्र लिहिले असून या पत्राची प्रत माध्यमांना उपलब्ध झाली आहे. साहिल सय्यद आपल्याच पक्षाच्या नेत्यांना हनीट्रॅप करतो आहे याबाबत देशमुख यांनी पत्रात आश्चर्य व्यक्त केले आहे. ऑडिओ क्लिपमध्ये साहिलने न्यायव्यवस्थेला मॅनेज करण्याबाबत वक्तव्य केल्याचे नमूद करीत यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले असल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या