सव्वा वर्ष जोशी, सव्वा वर्ष तिवारी; नागपूरकरांना अडीच वर्षात मिळणार 2 महापौर

1038

नागपूर महानगरपालिकेच्या पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळात नागपूर शहराला दोन महापौर मिळणार आहेत. सत्ताधारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली सव्वा वर्षे संदीप जोशी आणि त्यानंतरची सव्वा वर्षे दयाशंकर तिवारी महापौर असतील, उपमहापौर पदाबाबतही असाच निर्णय घेण्यात आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली होती़ शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत नागपूरसाठी दोन महापौरांची निवड करण्यात आली. आता महापौरपद हे सव्वा सव्वा वर्षासाठी राहणार आहेत. यात पहिल्या टर्ममध्ये संदीप जोशी तर दुसऱ्या टर्ममध्ये दयाशंकर तिवारी हे महापौरपद सांभाळतील़. उपमहापौर पदासाठीही हाच फार्म्युला निश्चित करण्यात आला आहे. उपमहापौरपदासाठी मनिषा कोठे व संदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. यात महापौरपदाचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा असतो. त्यासाठी आरक्षण सोडत काढली जाते. नागपूर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण प्रवर्ग असे होते. नंदा जिचकार यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांच्यासह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरांचा कार्यकाळ येत्या 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. वास्तविक 5 सप्टेंबर 2019 रोजीच महापौरपदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र विधानसभा निवडणुका असल्यामुळे 21 ऑगस्ट रोजी तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत येत्या 21 तारखेला संपत आहे.

संख्याबळ –
एकूण सदस्यसंख्या – 151
भाजप – 108 (एका नगरसेवकाचे निधन व एक अपात्र ठरल्याने सध्या सदस्यसंख्या 106)
काँग्रेस – 29
बसपा – 10
शिवसेना – 2
राष्ट्रवादी – 1
अपक्ष – 1

आपली प्रतिक्रिया द्या