IPL सट्टेबाजीत कंगाल झालेल्या तरुणाने आत्महत्या केली, मानसिक धक्का बसल्याने आईनेही जीव दिला

IPL 2023मध्ये सट्टेबाजी करून बक्कल पैसा कमावण्याच्या नादात नागपुरातील एका तरुणाने लाखों रुपये गमावले. मोठी रक्कम सट्टेबाजीत गमावल्याने घाबरलेल्या या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलाने आत्महत्या केल्याचा त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या या महिलेने फिनाईल पिऊन जीव दिला. मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच त्याच्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले, ज्यामुळे या कुटुंबावर पुन्हा शोककळा पसरली आहे.

ही घटना नागपुरातीलल लकडगंज जिल्ह्यातील छापरूनगर परिसरातील घडली आहे. येथे राहणारे नरेश वाघवानी यांचा मुलगा खितेन वाघवानी याने घरीच गळफासलावून आत्महत्या केली. मुलाचा मृत्यू झाल्याचे सहन न झाल्याने तरूणाच्या आईने फिनाईल पिऊन जीव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश वाघवानी आपल्या मुलासमवेत राहत होते. नरेश यांचा मसाल्याचा व्यापार असून त्यांचे नागपुरात होलसेल मसाल्याचे दुकान आहे.

21 मे रोजी नरेश पत्नीसह एका लग्नासाठी गेले होते. त्यावेळी खितेन घरी एकटाच होता. लग्नावरून घरी आल्यानंतर खितेनने त्याच्या खोलीतील पंख्याला गळफास लावलेला आढळून आला. मुलाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमिन सरकली. त्यांनी मदतीसाठी शेजारी हाक मारली. लोकांच्या मदतीने खितेनला ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खितेनच्या मृत्यूचा त्याच्या आईला जबरदस्त धक्का बसला होता. नैराश्याने गाठल्याने खितेनच्या आईनेही आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खितेन हा आयपीएल सट्टा खेळत असे. या सट्टेबाजीत त्याला मोठे नुकसान झाले होते. सट्ट्यासाठी घेतलेल्या पैशांवरून खितेन आणि बुकींमध्ये वाद असावा आणि हे बुकी खितेनला त्रास देत असावेत असा पोलिसांना संशय आहे. बुकींच्या दबावामुळेच खितेनने आत्महत्या केली असावी असं पोलिसांना वाटतं आहे. सदर प्रकरणाचा तपास नागपूर शहरातील परिमंडळ5 चे डीसीपी गोरख भामरे यांच्या निरीक्षणाखाली सुरू आहे.