मिशी कापली म्हणून त्याने केली नाव्ह्याविरोधात पोलिसांत तक्रार

35

सामना प्रतिनिधी । नागपूर

केशकर्तनालयात दाढी कटिंग करण्यासाठी गेलेल्या इसमाला न विचारता त्याची मिशी कापली म्हणून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचा अफलातून प्रकार कन्हान येथे 16 जुलै रोजी दुपारी तीन वाजता घडला. घडलेल्या प्रकाराची व्हॉट्सऍपवर एनसीआर कॉपी व फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांत हा विषय चर्चेचा ठरला.

तारसा मार्गावरील कन्हान येथील फ्रेण्ड्स जेन्ट्स पार्लरमध्ये किरण किसन ठाकूर (38) हे मंगळवारी दुपारी दाढी कटिंग करण्यासाठी गेले. यादरम्यान येथील कारागिराने त्यांना न विचारताच त्यांची मिशी कापली. ठाकूर यांना मिशी आवडत असल्याने त्यांनी घडलेला प्रकार व कारागिराची माहिती मोबाइलवरून दुकानमालक सुनील लक्षणे यांना दिली. परंतु त्यांनी कारागिराला समज देण्याऐवजी ‘मुछकट गयी होगी तेरी। तेरे को जो करना होगा करले। मै तुझे देख लुंगा’, असे उद्धट उत्तर दिले. यामुळे अपमानित झालेल्या ठाकूर यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार कन्हान पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एनसीआर दाखल केला असून ठाकूर यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या