नरभक्षक वाघिणीपासून बचावासाठी त्याने बनवले चिलखत

67

सामना ऑनलाईन । नागपूर

९ ग्रामस्थांचा फडशा पाडणाऱ्या वाघिणीपासून बचावासाठी यवतमाळच्या एका गुराख्याने नामी शक्कल लढवून अनोखे चिलखत बनविले आहे. पिण्याचे टिनपाट, तार, खिळे आणि रबरी टय़ूबचा वापर करून शंकर आत्राम याने खास चिलखत बनविले आहे. हे चिलखत स्वसंरक्षणासाठी तर आहेच, शिवाय वाघाच्या दहशतीने किती काळ घरी बसणार म्हणून शोधलेला उपाय आहे.

राळेगाव तालुक्यातील बोराटी गावचा रहिवासी असलेले शंकर दररोज हे चिलखत घालूनच घराबाहेर पडतात. ते गुराखी असून गावातील गुरं ढोरं चरण्यासाठी जंगलात नेतात. या परिसरात नरभक्षी वाघिणीची दहशत असून शेतकरी, शेतमजूर, महिला, ग्रामस्थ एकटे दुकटे घराबाहेर पडायला घाबरतात. या वाघिणीने तब्बल ९ ग्रामस्थांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे यात दोन गुराख्यांचा समावेश आहे. गुराखी असलेल्या शंकरलाही वाघाच्या दहशतीने घरी बसविले. मात्र, घरी घाबरून बसण्यापेक्षा वाघिणीपासून स्वतःच्या जीवाचा बचाव करण्यासाठी शंकरला कल्पना सुचली आणि त्यांनी हे अनोखे चिलखत बनविले.

शंकर यांनी टिनपटाला तार बांधून पोट, छाती आणि पाठ झाकेल असे आवरण तयार केले. खांद्यावर त्यांनी ताटली बांधली. तर, वाघिण गळ्याचा घोट घेऊ नये म्हणून लोखंडी पत्र्यावर टायर टय़ूब गुंडाळून आतून बाहेर अणुकूचिदार खिळे ठोकले. कंबरेवर देखील टय़ूबला काटेरी तार गुंडाळून गुडघ्यापर्यंत पॅन्ट तयार केली असून डोक्यावर जुने हेल्मेट घातले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या