अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ; जात प्रमाणपत्राला हायकोर्टात आव्हान

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असतानाही पंजाबमधील ‘लुभाणा’ जातीचा राणा यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. याविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दोन याचिका दाखल असतानाच मुंबई जात पडताळणी समितीने दिलेल्या जात प्रमाणपत्रालाच आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांच्या खंडपीठासमोर लवकरच यावर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता. राणा पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या असल्याने अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी राणा अपात्र होत्या. त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल करण्यात आली आहे. आता खासदार राणा यांनी निवडणूक लढविताना मुंबई जात पडताळणी कमिटीने दिलेल्या मोची जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले. या जात प्रमाणपत्रालाच आव्हान देत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी ऍड. प्रमोद पाटील यांच्यातर्फे हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या