महापालिका अधिकाऱ्याला भाजप आमदाराची शिविगाळ; लेखणीबंद आंदोलन

700

नागपूर महापालिकेतील एका आधिकाऱ्या भाजपचे विधान परिषद सदस्य, नगरसेवक प्रवीण दटके यांनी आज कार्यालयात जाऊन अश्लील शिविगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत प्रवीण दटके माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

पालिकेचे नगररचना सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना दटके यांनी शिविगाळ केली. हे समजताच महापालिकेतील सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर पडून विरोध करू लागले. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देत लेखणीबंद आंदोलन करण्याचे जाहीर केले. आयुक्तांनी अत्यावश्यक सेवा व तातडीच्या कामांना यातून वगळण्याची सूचना केली. तसेच याबाबत राज्य सरकारला कळविण्याचे आश्वासन दिले.

आयुक्तांच्या या भूमिकेनंतरही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या मतावर ठाम राहत संबंधित आमदाराने माफी मागावी असा आग्रह धरला. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराची कामे होत असतात. असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी हे आंदोलन असल्याचे कर्मचारी नेत्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांना निवेदन देते वेळी मनपाचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी नेते उपस्थित होते. या आंदोलनामुळे महापालिकेच्या दिवसभराच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या