नागपूर महापालिकेची रणधुमाळी

21
VOTE

नागपूर: महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक दिग्गज रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत़ यात आठ आजी-माजी महापौर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे़

यंदा काँग्रेसकडे जवळपास १२५० तर भाजपाकडे ३००२ जणांनी उमेदवारी मागितली आहे. काही अपक्षांनी भाजपाशी सलगी केली आहे. दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागण्यात माजी महापौरांचा समावेश आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून किमान आठ माजी महापौर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान महापौर प्रवीण दटके, माजी महापौर विकास ठाकरे, मायाताई इवनाते, अर्चना डेहनकर, राजेश तांबे, किशोर डोरले, देवराव उमरेडकर आणि कल्पना पांडे यांनी उमेदवारी मागितली आहे. महापौरपदी असणारे व यापूर्वी सत्तापक्ष नेत्यासह भाजपात अनेक महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या प्रवीण दटके यांची दावेदारी निश्चित मानली जाते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते असणारे विकास ठाकरे हे तिसऱ्यांदा भाग्य आजमाविणार आहेत.

गेल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले माजी महापौर किशोर डोरले आता काँग्रेसवासी झाले आहेत. माजी महापौर मायाताई इवनाते तिसऱ्यांदा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महापौरपदावर असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अर्चना डेहनकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता डेहनकर व माजी महापौर कल्पना पांडे यांनी तयारी सुरू केली आहे. राजेश तांबे हेदेखील इच्छुक आहेत़

नागपूरला लाभल्या सहा महिला महापौर

नागपूरला आजवर सहा महिला महापौर लाभल्या. महिला आरक्षण लागू झाल्यामुळे महिलांसाठी ही संधी चालून आली. कुंदा विजयकर यांच्या रूपाने नागपूरला पहिली महिला महापौर लाभली. त्यांच्यानंतर डॉ़ कल्पना पांडे, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, माया इवनाते, अर्चना डेहनकर यांनी हे पद भूषविले. कुंदा विजयकर यांचे वडील बॅरि. शेषराव वानखेडे १९५२ मध्ये नागपूरचे महापौर झाले़ तेव्हापासून १९९५ पर्यंत शहरात तब्बल ३८ महापौर झाले़ ५ फेब्रुवारी १९९६ रोजी कुंदाताई महापौर झाल्या.

महिला महापौरांना बसला पराभवाचा धक्का

देवराव उमरेडकर हे महापौरपदी विराजमान झाले होते़ मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने त्यांना सहा महिन्यांत महापौरपद सोडावे लागले. इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव आहे़ महिला महापौर म्हणून कुंदा विजयकर, कल्पना पांडे, वसुंधरा मासूरकर, पुष्पा घोडे, अर्चना डेहनकर, मायाताई इवनाते यांनी पद भूषविले. महापौरपद प्राप्त झाल्यानंतर पुढील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महिला महापौरांना पराभवाचा सामना करावा लागला. मायाताई इवनाते याला अपवाद ठरल्या. त्यांनी विजय खेचून आणला होता.

आपली प्रतिक्रिया द्या