‘संघा’ने रणनीती बदलली ‘राममंदिर’ नव्हे, दहशतवादच लोकसभा निवडणुकीतला मुद्दा

सामना प्रतिनिधी । नागपूर

पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या ताफ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर लोकसभा निवडणुकीत राम मंदिराऐवजी पुलवामाचा हल्ला म्हणजेच दहशतवादाचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर घेण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवले आहे. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात 40 हिंदुस्थानी जवान शहीद झाल्याने अख्खा देश हादरला आहे. त्यामुळे ‘संघा’ने आपली रणनीती आणि मुद्दय़ांचा प्राधान्यक्रम बदलला आहे.
संघाच्या विदर्भ प्रांताची एक बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीला संघाचे 39 प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत राम मंदिराऐवजी दहशतवादाचा मुद्दा अग्र्रस्थानी आणून जोरकसपणे मांडण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. ही नवी भूमिका संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी सर्व प्रांतांमध्ये आता बैठका घेण्यात येणार आहेत. यापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिराच्या उभारणीचा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अग्रक्रमावर घेतला होता.