नागपूरचा पराभव भाजपच्या जिव्हारी

3104

महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजपा नेतृत्व महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर कमालीचे संतापले असून भाजपाध्यक्ष अमित शाह हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिल्ली दरबारी बोलावून कानउघाडणी करण्याची शक्यता भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय असणाऱया नागपुरातच भाजपाची दाणादाण उडाल्याने भाजपा नेतृत्वाला हा पराभव अधिक जिव्हारी लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची राज्यात जबरदस्त पीछेहाट झाली असून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. विदर्भ व मराठवाडय़ात भाजपाला अनेक हक्काच्या जिल्हा परिषदा गमवाव्या लागल्या आहेत. राज्यातील सत्ता गेल्यामुळे अगोदरच सैरभैर झालेल्या दिल्लीतील नेत्यांना या पराभवाने अधिकच अस्वस्थ केल्याचे सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत अतिआत्मविश्वास दाखवल्याने भाजपाला अनेक ठिकाणी धोबीपछाड मिळाली तर चंद्रकांत पाटलांसारखा अत्यंत निष्क्रिय प्रदेशाध्यक्ष असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येच कमालाची मरगळ आल्याची टीका आता पक्षातूनच केली जात आहे. या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांनी कोणतेही परिश्रम घेतले नसल्याने प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांच्या हाकालपट्टीचीही मागणी होण्याची चिन्हे आहेत. काँगेसमुक्त महाराष्ट्र करण्याच्या नादात भाजपा महाराष्ट्रमुक्त होत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याने भाजपा नेतृत्व चिंतेत आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हय़ात तर भाजपाच्या हाती एकही सत्ताकेंद्र राहिलेले नाही. त्यामुळे पाटील यांची कार्यपद्धती वादाच्या भोवऱयात सापडली आहे.

जेएनयूमधील प्रकरण शांत झाल्यानंतर कदाचित पुढील आठवडय़ात फडणवीस व पाटील यांना दिल्लीत पाचारण करून महाराष्ट्रातील पराभवाचे पोस्टमार्टम केले जाईल आणि पराभवाची जबाबदारी निश्चित केली जाईल, अशी माहिती भाजपाच्या गोटातून मिळाली आहे.

फडणवीस म्हणतात, तयारीला वेळ मिळाला नाही!

जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या दारुन पराभवानंतर खडबडून जाग्या झालेल्या भाजप नेत्यांनी बैठक घेत निवडणूक निकालावर चिंतन केले. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेतील पराभव जिव्हारी लागलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र येऊन लढल्याने तयारीला वेळ मिळाला नाही, असा सुरू आळवला.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही फडणवीस यांनी ऐनवेळी निवडणुकीची रणणीती आखण्यात भाजप कमी पडली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन लढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत पुरेशी तयारी करायला वेळ मिळाला नाही. यामुळे नागपूर, पालघर जिल्हा परिषदेत  भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद,निवडणूक निकालाचा एकत्रित विचार करता भाजपला मागील वेळी 52 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये दुप्पट वाढ होऊन 103 जागा झाल्या आहेत. पंचायत समितीतही भाजपच्या जागा अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत वाढल्याचे फडणवीस म्हणाले.

मनसे-भाजप एकत्र येण्याची तुर्तास शक्यता नाही

मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या विचारधारा या भिन्न आहेत. त्यामुळे तुर्तास तरी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही. मनसेने त्यांची कार्यपद्धती व विचार बदलल्यास भविष्यात त्यांना सोबत घेण्याचा विचार केला जाईल. भाजप एक राष्ट्रीय पक्ष असून सर्व समाज, जाती, धर्माचे व भाषा बोलणारे लोक आमच्यासोबत असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या