पत्नीने मुलीच्या मदतीने सुपारी देऊन प्राचार्य नवऱ्याला संपवले

30

सामना प्रतिनिधी । नागपूर

एका प्राध्यापक महिलेसोबत अनैतिक संबध असल्याचा आरोप करत प्राचार्य डॉ. मोरेश्‍वर वानखडे यांना त्यांची पत्नी व मुलीनेच सुपारी देऊन संपवल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघड झाला आहे. हत्याकांडाला अपघात किंवा लुटमारीचा देखावा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी मुलगी व पत्नीला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा उलगडा केला. एकूण सहा आरोपींना बजाजनगर पोलिसांनी अटक केली, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. प्राचार्याची पत्नी अनिता मारेश्‍वर वानखडे (४२), मुलगी सायली पवन यादव (२३), शुभम ऊर्फ बंटी मोहुर्ले, अंकित रामलाल काटेवार (१९), शशिकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९), सागर ऊर्फ पाजी बावरी (२०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

डॉ. मोरेश्‍वर वानखडे (६०) हे चंद्रपुरातील खत्री कॉलेजमध्ये प्राचार्य होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास दुचाकीने रेल्वेस्टेशनला जात होते. दरम्यान निरी गेटसमोर पाच आरोपींनी डॉ. वानखडे यांच्या दुचाकीला मागून धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर तलवारीने सपासप वार करून खून केला आणि पळून गेले. प्राथमिकरित्या लुटमार करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी खून केला असावा, असा संशय पोलिसांना होता. बजाजनगर पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करून त्यांची पत्नी अनिता, मुलगा तन्मय आणि मुलगी सायला यादव यांना माहिती दिली. त्यांनीही लुटमारीतून खून झाल्याचा संशय व्यक्‍त केला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

डॉ. वानखडे आणि शिक्षिका असलेली पत्नी अनिता यांच्यात पटत नव्हते. यापूर्वी अजनी पोलिस ठाण्यात मुलगा आणि पत्नीने मारहाण केल्याची तक्रार डॉ. वानखडे यांनी केली होती. त्यानंतर भरोसा सेलमध्येही पती-पत्नीचे समूपदेशन करण्यात आले होते. त्यावरून घरात काहीतरी वाद नक्‍कीच असल्याचे पोलिसांना आढळून आले. बाहेरच्या आरोपींच्या टोळीपर्यंत पोहचण्यापूर्वी पोलिसांनी तपासाची दिशा घरगुती वादावर केंद्रीत केली होती.

त्यानंतर पोलिसांनी पत्नी अनिता आणि मुलगी सायली हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघींनीही डॉ. वानखडेपासून त्रस्त झाल्याची माहिती दिली. सायलीचा मोबाईल ताब्यात घेतला असता त्यामध्ये शुभम नावाच्या युवकाला वारंवार फोन केल्याचे आढळून आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता शुभमने सायलीला फोन केला होता. तिला विचारणा केली असता ती अनुत्तरीत झाली. त्यामुळे शुभमला ताब्यात घेण्यात आले. शुभमला पहाटे कॉल करण्याचे कारण विचारले असता तोसुद्धा घाबरला. अनिता, सायली आणि शुभमला पोलिसी खाक्‍या दाखवताच तिघांनीही खुनाची कबुली दिली.

आपली प्रतिक्रिया द्या