चिमुकलीची बलात्कार करून ठेचून हत्या,नागपुरातील घटनेविरोधात मोर्चा

454
प्रातिनिधिक फोटो

नागपूरमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेविरोधात सोमवारी जनक्षोभ उसळला. संतप्त नागरिकांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी नराधमाला तत्काळ फासावर लटकवा, अशी मागणी करत प्रचंड मोर्चा काढला. तसेच पोलिसांना घेराव घातला आणि दिवसभर बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध केला.

नराधम संजय पुरी (32, रा. मोहगाव) याने पीडित मुलीचा मृतदेह दगडाने ठेचून शेतात फेकल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे ही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. आरोपी पुरी याच्याविरुद्ध भादंवि कलम 302, 376, पॉक्सो तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. न्यायालयाने पुरीला 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुरीला तत्काळ फासावर लटकवा, अशी मागणी पीडित मुलीच्या पित्याने केली आहे. आरोपी संजय पुरी हा शेतामध्ये सालगडी म्हणून काम करीत होता. पीडित मुलगी ही 6 डिसेंबरला आजीकडे गेली होती. तेथून घरी परतत असताना पुरीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून ताब्यात घेतले होते. मुलीच्या घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली होती. नंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह लिंगा येथील तुरीच्या शेतात दगडाने ठेचून टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

आंदोलनकर्त्यांवर सौम्य बळाचा वापर

संतप्त नागरिकांनी कळमेश्वर येथे रविवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढला, तसेच पोलीस ठाण्याला घेराव घालत बलात्कारी नराधमाला हवाली करण्याची मागणी केली. संतप्त आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. सोमवारी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पुकारला. दुपारी मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टम हवी – नीलम गोऱहे

अशा गंभीर गुह्यांची वेळीच उकल होण्यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टम (एसओपी) तयार करायला हवी, तसेच साक्षीदार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करायला हवी, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी केली. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या