गडकरींच्या वक्तव्यावर पवार-थोरातांची बॅटिंग

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भाने केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींच्या या वक्तव्यावर जोरदार बॅटिंग केली आहे.

गुरुवारी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले होते की, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकते. शेवटच्या क्षणाला तुम्हाला वाटत असते की तुम्ही हरणार, पण ऐनवेळी निकाल उलट लागतो आणि तुम्ही जिंकता. तोच नियम राजकारणातसुद्धा लागू असल्याचे गडकरी म्हणाले होते.

शुक्रवारी शरद पवार यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी क्रिकेटचा खेळाडू नसून क्रिकेटचा प्रशासक होतो. आमच्याकडील पक्षांनी आपली टीम तयार केली आहे. त्याच वेळी बाळासाहेब थोरात यांनीही गडकरींना टोला लगावला आहे. ते म्हणाले, गडकरी आमचे मित्र आहेत, पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये बॉल दिसतो, पण भाजपला इथे बॉलच दिसला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या