महापालिकेचा परिवहन विभाग घोटाळ्याने बरबटला

34

सामना प्रतिनिधी । नागपूर

घोटाळ्यामुळे सतत चर्चेत असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागावर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमुखाने आगपाखड केली अन् परिवहन विभाग घोटाळ्याने बरबटला असल्याचे सांगत विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले सदस्यांच्या सात्त्विक संतपाची दखल घेत अखेर महापौरांनी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली प्रश्नोत्तराच्या तासात परिवहन विभागातील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेने शहर बसेसच्या संचालनाची जाबदारी खाजगी ऑपरेटरकडे सोपविली आहे करारानूसार ४० प्रकारच्या विविध अटी शर्थी घालण्यात आल्या त्या खासगी ऑपरेटरला अनुकूल असल्याचा आरोप होत आहे डिसेंबर २०१७ पर्यंत कंपनीचे काम ट्रायल पिरेडवर होते. या दरम्यान, तब्बल तीन वेळा संप पुकारण्यात आला. मात्र, करारातील अटी-शर्थीचा हवाला देत पालिकेच्या परिवहन विभागाने केवळ एकच वेळा दंडाची रक्कम वसूल केली. बससेवा पूर्णपणे बंद होती तर, दंड का आकारला नाही? असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केला त्यावर भाजपाच्या बाल्या बोरकर यांनी कराराच्या अटीशर्थींमध्ये सेवा बंद असताना पेनल्टी स्वीकारता येत नाही, असे कुठेच नमूद नसल्याचे लक्षात आणून दिले.

चौकशीअंती कारवाई
तिकिट मशीन खरेदी करताना परिवहन समितीची मंजूरी घेण्यात आली नाही. पेनॉल्टी क्लॉजमध्ये संपाबाबत काहीही नमूद नसतानाही कारवाई झाली नाही. समिती अध्यक्षांच्या पत्रांवर व्यवस्थापक कारवाई करत नाही. या सर्व प्रकाराची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी. कारवाई निश्चित करून पुढील सभेत चौकशी अहवाल सादर करण्यात यावा, अशी सुचना सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केली तर महापौरांनी सर्व प्रकरणात चौकशी करून व कार्यवाही निश्चित करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले

तिकीट मशीन खरेदीत गौडबंगाल
परिवहन समितीची परवानगी न घेता तिकिट मशीन खरेदी करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापकांनी घेतला होता विशेष म्हणजे सुमारे १.१४ कोटी रूपय खर्च करून ८०० मशीन खरेदी करण्यात आल्या. यातील काही मशीन काम करीत नसल्याची बाबही पुढे आली आहे एक मशीन १९५२० रूपयात खरेदी करण्यात आली. त्याचवेळी इतर कंपन्यांकडे हीच मशीन १० हजारापर्यंत दर असल्याचे नमुद आहे. त्यामुळे खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्मार्ट कार्डव्दारे पैशांचा अपहार
तिकिट मशीन खरेदीतील आरोपांची शाई वाळत नाही तोच र्स्मार्ट कार्ड घोटाळा पुढे आला होता सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद होत होते ही समस्या कायमची सोडविण्यासाठी महापालिकेने एटीएमप्रमाणे स्मार्ट तिकीट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कार्डधारकांना प्रवास करताना कंडक्टरकडे असलेल्या मशीनमधून स्वाइप करावे लागते. त्यानंतर मिळणारी पावती हेच तिकीट समजले जाते. त्याची नोंद सर्व्हरमध्ये होते. मात्र काही कंडक्टर प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेऊन स्वतःजवळ असलेले कार्ड स्वाइप करून पावती प्रवाशांना देत होते. त्यांच्याजवळ असलेली मशीन कुठल्याही सर्व्हरला जोडली नव्हती. अर्थात पावत्या बोगस होत्या हा गैरव्यवहार पुढे आल्यानंतर ३५ कंडक्टरला निलंबित करण्यात आले होते

आपली प्रतिक्रिया द्या