घोटाळ्याच्या आरोपानंतर तुकाराम मुंढेंकडून स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला. तर प्रभारी सीईओपदाची धुरा डेप्युटी सीईओ महेश मोरोने यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे़

तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम करतील. तर काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे. नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची आज, शुक्रवारची वादळी सभा चालली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

आयुक्त मुंढेंवर स्मार्ट सिटी घोटाळ्याच्या मुद्यांवर भाजपाने अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्यांवर तब्बल तीन तासांपेक्षा जास्तकाळ चर्चा झाली. आयुक्तमुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बेकायदा बळकवल्याचे आजच्या बैठकीत सिद्ध झाले, असे प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी या बैठकीनंतर दिली. मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाची धुरा अवैधरित्या बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे सीईओ मुंढे यांचे वर्तन अवैध, असंवैधानिक, आणि घोटाळेबाज असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले होते. निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे, असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या