Video – कोरोना पाठोपाठ आणखी एक संकट, महाराष्ट्रावर भीषण टोळधाड; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात बहुभक्षी किड वाळवंटी टोळ या खादाड व पिकांचे नुकसान करणाऱ्या किड्यांनी हल्ला चढवला आहे. या किड्यांचे थवेच्या थवे आकाशात घोंगावत असून ते दृश्य भीतीदायक आहे. या किड्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. महाराष्ट्रासोबतच राजस्थान, पंजाब, गुजरात व मध्य प्रदेशमध्येही ही टोळधाड दिसून आल्याचे समजते.

वर्ध्यातील आष्टी आष्टी तालुक्यातील वडाळा, बेलोरा, खंबीत, साहूर आदी ठिकाणी शेतशिवारात पिकांवर टोळधाड दिसून आली आहे. गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ झाला. शेकडो एकरातील संत्री, मोसंबी, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. या किड्यांनी पिकांची पानं व फळं कुरतडली आहे. या भागात कृषी विभागाची पाहणी सुरू आहे. ही टोळधाड अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातून वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात दाखल झाल्याचे समजते.

वाळवंटी टोळ या बहुभक्षी किड्याचे शास्त्रीय नाव Schistocerca gregaria हे आहे. वाळवंटी टोळ ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड असून ती मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पतींचे नुकसान करू शकते. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या किड्यापासून शेतीचे संरक्षण करण्यसाठी काही उपाययोजना सांगितल्या आहेत. शेतात टिनाचे डबे, प्लास्टिक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करून मोठा आवाज काढल्यास ही कीड तुमच्या शेतात बसणे टाळेल. तसेच शेतात कडूनिंब, धोत्रा इतर तन किंवा पालापाचोळा जाळून धूर व शेकोटीचा वापर केल्यास या धुरामुळे तुमच्या शेतात बसणे टाळेल.

आपली प्रतिक्रिया द्या