बोंडअळीवरून विरोधकांचा गदारोळ; सत्तधारी अडचणीत

31

सामना प्रतिनिधी । नागपूर

बोंडअळी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी मांडलेली लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्याने विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांसमोरच गोंधळ घातला. मुख्यमंत्री मुद्दाम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावावरून भाजपचे आमदार आशीष देशमुख यांचे नाव कापल्याने त्यांनीही विधानसभा अध्यक्षांसमोर वेलमध्ये येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोधकांच्या बरोबरीने विधानसभा अध्यक्षांसमोर येऊन सरकारविरोधी भूमिका मांडल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले. चर्चेच्या प्रस्तावावरून माझे नाव का कापले, असा सवाल आशीष देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांना केला. विरोधकांचा विरोध झुगारून विधानसभा अध्यक्षांनी बोंडअळीवरील लक्षवेधी गुरुवारी चर्चेला येईल अशी घोषणा केली. तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही.

मी विरोधकांसोबत नव्हतो
यासंदर्भात बोलताना आमदार आशीष देशमुख म्हणाले, सत्ताधारी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नियम २९३ अन्वये प्रस्ताव दिला होता. त्यासाठी माझे नाव सुचविले होते. परंतु प्रस्ताव छापून आल्यानंतर त्यावर माझे नाव नव्हते. माझे नाव का कापले, अशी विचारणा मी विधानसभा अध्यक्षांना केली. त्याचवेळी विरोधकही गोंधळ घालत होते. विरोधकांसोबत मी नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू दिले नाहीत तर कामकाजावर बहिष्कार
शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले जाऊच नयेत यासाठी प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. संसदीय कामकाजमंत्री, दुग्धविकासमंत्री, कामगारमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी बोलूच नये अशी भूमिका वेळोवेळी आज सभागृहात घेत होते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडू देत नसेल तर आता सामान्यांचे, शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचे कुठे, असा प्रश्न मुंडे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या