नातवाने दारूच्या नशेत आजीच्या डोक्यात दगड घातला, कवटी फुटून मेंदू बाहेर आला

1059
प्रातिनिधिक फोटो

दारूड्या नातवाने शुल्लक कारणावरून दारूच्या नशेत आजीच्या डोक्यावर मोठा दगड घालून तिचा निर्घृण खून केला. ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान हद्दीतील मानवता नगर झोपडपट्टी येथे दोन मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राऊलाबाई रामदास गणवीर (70) असे हत्या झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. दगडाचा प्रहार इतका जोरदार होता की कवटी फुटून मेंदू बाहेर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवता नगर झोपपट्टीत 10 बाय 10 च्या एका खोलीत राऊलाबाई गणवीर आपला नातू लकी सुंदर गणवीर (20) आणि नातीन निकीता सुंदर गणवीर सोबत राहात होती. घरची परिस्थिती अगदीच हलाखीची असल्यामुळे नातू आणि नातीन दोघेही केटरींगच्या कामावर जात होते. केटरींगची ऑर्डरर नसताना नातू एका भाजीच्या ठेल्यावर मजूरी करायचा.

वाईट संगतीमुळे लकीला दारूचे प्रचंड व्यसन लागले होते, तर नातीन निकीताचे मागील दोन वर्षापासून एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या प्रेम संबंधांना घरच्यांची मंजुरी होती. पण लकीला मात्र हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमीच वाद होत असे. घटनेच्या दिवशी 2 मार्चला रात्री निकीताने आजीसाठी स्वयंपांक करून दिला. त्यावेळी लकी घरी आला आणि निकीताच्या प्रेमसंबंधांवरून वाद घालत त्याने तिला मारझोड केली. त्याच्या मारझोडीमुळे दुखी होऊन ती बाहेर निघून गेली. या मुळे वाईट वाटल्यामुळे आजी राऊलाबाई यांनी नेहमी नेहमी निकीताला का मारतो, असे म्हणत लकीला रागविले.

आजी ओरडल्याने याचा राग मनात धरून लकीने दारूच्या नशेत मोठा दगड तिच्या डोक्यात हाणला. त्याने केलेला प्रहार इतका घातक होता की वृद्ध महिलेची कवटी फुटून मेंदू बाहेर पडला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरिता सुंदर गणवीर यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गिट्टीखदान पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या