नग्न होत महिला रस्त्यावर धावत सुटली; प्रिन्स फिलीप यांच्या शोकसभेत राडा, व्हिडीओ व्हायरल

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारापूर्वी घेण्यात आलेल्या शोकसभेवेळी एका महिलेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. महिलेने अचानक आरडाओरडा करत कपडे काढून धावण्यास सुरुवात केल्याने उपस्थितही सैरभेर झाले. या महिलेला पकडताना पोलिसांचीही दमछाक उडाली. अर्थात या महिलेला नंतर अटक करण्यात आली.

ब्रिटनच्या स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स फिलीप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यापूर्वी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेला अनेक जण उपस्थित होते. शोकसभा सुरू असताना अचानक एक महिला पळू लागली आणि ‘सेव्ह प्लॅनेट, सेव्ह प्लॅनेट’ म्हणत ओरडू लागली. पळता पळता महिलेने अंगावरील टॉप काढला आणि ती टॉपलेस झाली.

शोकसभेदरम्यान झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिलेने अंगावरील कपडे काढल्याने पोलीस तिला ताब्यात घेण्यासाठी तिच्या मागे धावू लागले. यानंतर पोलिसांना तिला ताब्यात घेत तिच्या अंगावर पांढरे कापड टाकले. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं?

प्रिन्स फिलीप यांच्यावरील अंत्यसंस्कारापूर्वी सेंट जॉर्ज चॅपलच्या आत शोकसभा सुरू होती. यावेळी एक मिनिटांचे मौन बाळगण्यात आले. याचवेळी एक महिला मोठ्याने ओरडू लागली आणि राजवाड्याच्या गेटपासून रस्त्यावर पोहोचली. महिलेने अंगावरील कपडे उतरवले आणि राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावर उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.

9 एप्रिलला निधन

प्रिन्स फिलीप यांना कोरोनाची लागण झाली होती. 16 फेब्रुवारी रोजी त्यांना किंग एडवर्ड सप्तम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना हृदय रोग विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना पुन्हा किंग एडवर्ड रुग्णालयात आणले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर 16 मार्च रोजी त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र 9 एप्रिलला लंडनमध्ये त्यांचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या