साधना…

संजीवनी धुरी-जाधव

नृत्य… एक तपस्या, साधना… केवळ चित्रपटांत शिरकाव करण्याचे किंवा प्रसिद्ध होण्याचे माध्यम नव्हे. अजूनही या क्षेत्रात पुरुष नर्तकांचे प्रमाण खूप कमी आहे. या संदर्भात अभिनेता आणि नर्तक नकुल घाणेकर याच्याशी केलेली बातचीत.

खरं तर नृत्य ही शैली पुरुषप्रधानच आहे. नृत्य हे पुरुषानेच आणलंय… भगवान शंकर, श्रीकृष्णाने ते आणले आहे. पूर्वी स्त्र्ायांनी नृत्य करणे समाजसंमत मानले जात नव्हते. पूर्वी राजदरबारात पुरुषच नाचायचे. नंतर स्त्र्ाया येऊ लागल्या आणि पुरुष त्यातून बाहेर पडू लागले. कारण आपली संस्कृती तशी आहे. आता पुरुष आणि स्त्रीया दोघेही या क्षेत्रात आहेत. आजची पिढी कथ्थकसारख्या शैली करायला घाबरतात. कोणी पुरूष नृत्य शिकल्यामुळे बायकी होत नसतो. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत प्रभुदेवा, कमल हसन हे शास्त्रीय नर्तक आहेत, राजेंद्र गंगाणी जे अतिशय सुंदर आणि उत्तम जयपूर घराण्यातील कथ्थक नर्तक आहेत. ते पुरुषी नाचतात आणि छान नाचतात. त्यांचा नाचण्यात कुठेच बायकीपणा दिसत नाही. कथ्थक हे शास्त्रीय नृत्यच आहे जे मी शिकतो आणि शिकवतो. माझ्या गुरू सोनिया परचुरे आहेत ज्यांच्याकडे मी गेले पंधरा-वीस वर्षे शिकतोय. आणि गेले तीन-चार वर्षे शिकवतोय, कला सादर करतोय. माझे जगभरात कार्यक्रम झाले आहेत.

अनेक गैरसमज

शास्त्रीय नृत्य शिकणं हे सौभाग्यच… हे भाग्य आहे प्रत्येक नर्तकाचे. सालसा हे शास्त्रीय नृत्य नाहीय, पण त्याला शास्त्रीय नृत्यासारखी थोडी चौकट आहे. काही नृत्यांना काहीच चौकट नसते. बॉलीवूड म्हणा, लावणी म्हणा किंवा हिपहॉप म्हणा, यात चौकटी फार कमी असतात. बऱयाच रिऑलिटी शोजमध्ये डोक्यावर चक्री केली, स्केटिंग करत करत नाचायचे किंवा उलटे लटकत दांडिया खेळायचा याप्रकारे नृत्य केले जाते, पण हे जे आहे ती सर्कस आहे हे नृत्य नाहीय, हे लोकांना  कळत नाहीय. काहीतरी थरारक केले की झाला डान्स… हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. लोकांना वाटत ढॅणढॅण संगीत वाजल्याशिवाय डान्स होणारच नाही. आपल्याकडे नृत्याबाबत अनेक गैरसमज आहेत.

स्वतःला अपडेट ठेवतो

अपडेट राहण्यासाठी सालसाच्या बाबतीत मी स्वतःला ट्रेन करतो. आताच मी चार दिवस सिंगापूरला गेलो होतो. मुंबईतला एखादा महोत्सव असो, दिल्लीतला एखादा महोत्सव असो वा बंगळुरुमध्ये असो, त्या त्या महोत्सवात जातो आणि स्वतःला अपडेट करतो. सालसा आणि कथ्थकच्या बाबतीत माझ्या गुरूंकडे मी विद्यार्थी म्हणून सतत जातो. लोकांना वाटतं दहा वर्षे शिकलो म्हणजे झालं. आलं आपल्याला सगळं. पण असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो. म्हणून स्वतःला नेहमी अपग्रेड करायला हवं आणि मी ते करतो.

मुलांना नृत्यकौशल्य शिकवा

माझ्याकडे काही अभिनेत्री कथ्थक आणि सालसा शिकायला येतात. त्यांनाही ही आता गरज वाटू लागली आहे की, अभिनयाबरोबर उत्कृष्ट नृत्याची जोड मिळाली तर पुढे एखादा चांगला प्रोजेक्ट मिळू शकतो. असं वाटणं साहजिकच आहे. काही पालक आपल्या मुलांना टीव्हीवर जाण्यासाठी डान्स शिकवतात. ते खूप चुकीचे आहे. मुलगा चमकेल म्हणून नाही शिकवायचे. त्यांना त्यांचा आनंद, फिटनेस आणि कौशल्यासाठी नृत्य शिकवायचे. मोठा झाल्यावर तो काय हा भाग वेगळा… स्पर्धा नक्कीच वाढलेली आहे. पण दर्जा वाढवायला हवा.

रिअॅलिटी शोजने मनावर घ्यायला हवे!

कथ्थक शिकण्यासाठी गुरू हवाच. पण आताची पिढी सुरुवातीला काही वर्ष एकाकडे शिकतात आणि नंतर फक्त मोठमोठय़ा दिग्गजांच्या कार्यशाळांना जातात. पण नुसत्या कार्यशाळा करून कुणीच मोठा कथ्थक डान्सर होऊ शकत नाही. मुळात चार वर्षे ज्या गुरूने शिकवले त्याच्याकडेच नियमित जायला पाहिजे. महिन्यातून किमान चारवेळा तरी. मला वाटतं पुढच्या काही वर्षात पुन्हा एकदा कथ्थक, भरतनाटय़म या शास्त्रीय नृत्यांना चांगले दिवस यायला हवेत. लोकांनी त्याकडे जास्त वळायला हवे. शास्त्रीय नृत्यासाठी रिअॅलिटी शोजमध्ये शास्त्रीय नृत्य येणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या