टोळीसाठी ‘क्षात्रधर्म साधना’ची प्रेरणा- पोलिसांचा दावा

19

सामना प्रतिनिधी । मुंबई

वैभव राऊत, शरद कळसकर यांच्यासह अटक केलेले अन्य 10 जण हे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती व काही अन्य संघटनांचे सदस्य आहेत. तसेच या सर्वांनी सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात नमूद केलेल्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन समविचारी युवकांची दहशतवादी टोळी बनविल्याचे तपासात आढळून आल्याचे एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे.

या टोळीने हिंदुस्थानची एकता, अखंडता, सुरक्षा व सार्वभौमत्वाला धोका पोहचवण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल, गावठी बॉम्ब इत्यादीचा वापर करून हिंदू धर्म, रुढी, प्रथांविरोधात लिखाण करणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना लक्ष केले आणि त्यातून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून डिसेंबर 2017मध्ये पुणे येथे आयोजित ‘सनबर्न’ या पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमास आरोपींनी लक्ष्य केले होते. त्या कार्यक्रमात गावठी बॉम्ब, पेट्रोल बॉम्ब, अग्निशस्त्र, दगडफेक अशा प्रकारे घातपाती कारवाया करून जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणची रेकी करून घातपाताची तयारी केली होती. परंतु एक आरोपी रेकी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आल्याच्या संशयावरून ऐन वेळी तयारी केलेली असतानाही घातपात केला नव्हता, असेही तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी दोषारोपपत्रात केला आहे. याशिवाय सदर टोळीने हिंदू धर्म, रुढी, परंपरांवर टीका करणारे साहित्यिक, विचारवंत व सामाजिक व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची रेकी केल्याचेदेखील तपासात उघडकीस आल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या