नालासोपाऱ्यात तब्बल 1400 कोटींचा ‘एमडी’ ड्रग्ज साठा, मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज नालासोपारा येथून तब्बल 1400 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे झटपट पैसे कमावण्यासाठी प्रवीणकुमार सिंग याने ‘केमिकल लोच्या’ करून हे ड्रग्ज बनवल्याचे उघड झाले आहे.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटने 29 मार्च रोजी गोवंडी येथे एका ड्रग्ज पेडलरला 250 ग्रॅम एमडीसह रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अन्य तिघा साथीदारांना टप्प्याटप्प्याने अटक केली. 3 तारखेला अटक केलेल्या चौथ्या आरोपीच्या चौकशीत नालासोपारा येथे राहणाऱया प्रवीणकुमार सिंग (52) याचे नाव समोर आले. त्यानुसार वरळी युनिटने प्रवीणकुमार याला पकडले. त्याच्याकडे पोलिसांना 701 किलो 740 ग्रॅम वजनाचा व 1403 कोटी 48 लाख किमतीचा एमडीचा साठा सापडला.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवीणकुमारचा हा ड्रग्जचा कारभार सुरू होता. अटक केलेल्या आरोपींकडून तब्बल 1407 कोटी 99 लाख 50 हजार किमतीचा 704 किलो 840 ग्रॅम वजनाचा एमडी साठा जप्त करण्यात पोलिसांना यश असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे ड्रग्ज माफिया व तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

पाच महिन्यांत साखळीच तोडली

29 मार्च रोजी गोवंडीत एका तस्कराला 250 ग्रॅम एमडीसह पकडल्यानंतर त्याने ज्याच्याकडून एमडी घेतला त्याचे नाव सांगितले. मग पोलिसांनी दुसऱया ड्रग्जतस्कराला पडून त्याच्याकडून दोन किलो 760 ग्रॅम एमडी जप्त केला. त्यानंतर दोघांच्या चौकशीत एका महिलेचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी 27 जुलै रोजी त्या ड्रग्ज तस्कर महिलेच्या मुसक्या आवळल्या. तिच्या चौकशीत चौथ्या आरोपीचे नाव समोर आले. त्याला पकडल्यानंतर या सर्वांना एमडीचा पुरवठा करणारा व स्वतŠ एमडी बनविणारा प्रवीण असल्याचे स्पष्ट होताच त्यालादेखील पकडण्यात आले. पाच महिन्यांत एमडी ड्रग्जचा कारभार करणारी एक टोळीच उद्ध्वस्त केल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

प्रवीणकुमार उच्चशिक्षित

प्रवीणकुमार याने रसायन ऑर्गेनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले असून सुरुवातीला दोन ठिकाणी काम केले होते. मात्र गेल्या दोन–तीन वर्षांपासून प्रवीणकुमारने झटपट पैसा कमावण्याच्या लालसेपोटी वेगवेगळय़ा केमिकलवर रासायनिक प्रक्रिया करून एमडी बनविण्यास सुरुवात केली. मुंबईबाहेर एका पंपनीत अन्य सहकाऱयाच्या मदतीने तो एमडी बनवत असल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीतून मिळाली.