नालासोपाऱ्यात प्रतिब्रह्मोत्सवाची जोरदार तयारी

93

सामना ऑनलाईन । वसई

गोविंदा.. व्यंकट रमणा.. गोविंदाच्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी बालाजी आणि पद्मावतीचा भव्य विवाह सोहळा होणार आहे. नालासोपाऱ्यातील श्रीप्रस्थ ग्राऊंड येथे होणाऱ्या या प्रतिब्रह्मोत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू असून संपूर्ण शहर सध्या विद्युतरोषणाईने न्हाऊन निघाले आहे. ‘न भुतो न भविष्यती’ अशा देदीप्यमान विवाह सोहळ्याकरिता दोन लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून अवघे वातावरण मंगलमय होणार आहे.

तिरुमला-तिरुपती देवस्थान व विरार येथील ओम साईधाम मंदिर ट्रस्टच्या वतीने हा विवाह सोहळा होणार असून तिरुपती देवस्थानात साजरा झालेल्या ब्रह्मोत्सवाचा संपूर्ण सेट नालासोपाऱ्यात आणला आहे. शनिवारी श्रीनिवास, श्रीदेवी, श्रीभूदेवी या देवतांच्या मूर्तींची षोडशोपचारे पूजा केली जाणार असून मंत्रोपचाराने सुप्रभातम्, तोमाल सेवा, कुंकुमार्चनम, विष्णुसहस्त्रनाम, तुलाभार आदी विधी संपन्न होणार आहेत. दुपारी ३ वाजता नालासोपारा येथील वर्तक टॉवर ते श्रीप्रस्थ ग्राऊंड या दरम्यान देवतांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.

महाप्रसादासाठी दोनशे आचारी

देवतांची भव्य मिरवणूक मैदानात आल्यानंतर गोरज मुहूर्तावर गोविंदा.. व्यंकटरमणा.. गोविंदा.. च्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत मंगल विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी सुमारे पाचशे जोडपी पूजेकरिता उपस्थित राहणार असून मुख्य मंगल सोहळा मंडपाशेजारी स्वतंत्र मोठा मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपात जीवदानी देवी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना महाप्रसाद दिला जाणार असून आंध्र प्रदेश, तामीळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील १५ विविध पदार्थांचा त्यात समावेश आहे. या मिष्ठान्नांचा भोग दाखविल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे. हा महाप्रसाद बनविण्यासाठी दोनशे आचाऱयांना आमंत्रित करण्यात आले आहे.

गूळ, तूप, फळे, कडधान्यांची तुला

या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याप्रसंगी गूळ, तूप विविध प्रकारची फळे तसेच कडधान्यांची तुला केली जाणार आहे. त्यातून मिळणारे हे सर्व साहित्य तिरुपती येथील देवस्थानाला भेट दिले जाणार असून त्याचा उपयोग प्रसादासाठी केला जाणार आहे. महाप्रसादानंतर तिरुपती देवस्थानहून आणलेल्या लाडूंचा प्रसाद तसेच देवांच्या प्रतिमांची भेट भाविकांना दिली जाणार आहे.

अवयवदानाबद्दल जनजागृती
प्रतिब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. देहदान तसेच अवयवदानाचे महत्त्व यावेळी सांगितले जाणार असून त्यासाठी अर्जदेखील भरून घेतले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या