गोविंदा.. गोविंदा… व्यंकटरमणा गोविंदा… नालासोपाऱ्यात ‘तिरुपती बालाजी’चे शाही शुभमंगल

925

गोविंदा गोविंदा… व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष, कुंकुंमार्चनम् , तुलाभार, लाडूचा महाप्रसाद आणि त्यानंतर आली लग्नघटी समिप… म्हणत मंत्रोच्चारात तिरुपती बालाजी आणि पद्मावतीचे शुभमंगल…18 जानेवारीला नालासोपाऱ्यात अलकापुरी येथे गोरज मुहूर्तावर हा शाही विवाह सोहळा पार पडणार असून श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दोन लाख भाविक हजेरी लावणार आहेत.

 तिरुपती तिरुमाला देवस्थानमार्फत तसेच ॐ श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, विरार व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून गेली सहा वर्षे श्रीनिवास मंगल महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जातो. 2013 साली विरार येथील विवा मलांज ग्राऊंडवर हा मंगल महोत्सव प्रथम संपन्न झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये वसईत, 2015 मध्ये मीरा-भाईंदर, 2016 मध्ये बोईसर, 2017 मध्ये पुन्हा नालासोपारा आणि गेल्या वर्षी सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला होता. यंदा या महोत्सवाचे सातवे वर्ष असून नालासोपारा  (पूर्व) येथील अलकापुरी मैदानावर  हा महोत्सव भरवला जाणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे तिरुमाला देवस्थानमार्फत श्रीनिवास, श्रीदेवी व भूदेवींच्या मूर्ती आणल्या जातात. या तिन्ही मूर्तींचे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या पूजाऱ्यांच्या हस्ते शास्त्राrय पद्धतीने मंत्रोचारासह पूजा व धार्मिक विधी संपन्न केले जातात. देवस्थानमार्फत प्रसाद लाडू, टिक्का व नाडा भाविकांना देण्यात येतो. पहाटेपासून सुरू होणारा हा मंगल सोहळा रात्री उशिरापर्यंत चालणार आहे.

 फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई 

मंगल सोहळाच्या मंडप तसेच प्रवेशद्वार रांगोळी व फुलांनी सुशोभित केला जाणार आहे. श्री निवास व इतर देवतांच्या मूर्ती पाना-फुलांची सजावट केली जाणार असून चेन्नई येथून मागविलेल्या 75 फूट उंच श्री बालाजी व पद्मावतीच्या प्रतिमांवर रोषणाई करण्यात येणार आहे. श्री कृष्ण वरधा व श्री गणेशाच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या