लेख : संतांनी केलेले गणेश स्तवन

>>नामदेव सदावर्ते<<

संतांनी श्रीगणेशाला अभिनव, कलात्मक, अलंकारिक काव्यप्रतिभेद्वारे वंदन केले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानरूप गणेशाला वंदन केले आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रीगणेशाचे रूप प्रकट करून त्या अलौकिक श्रीगणेशाला ज्ञानराज वंदन करतात. सद्गुरूकृपारूप श्रीगणेशालाही विविध रूपकाद्वारे संत वंदन करतात. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधात श्रीगणेशाचे अत्यंत कलात्मक, अभिनव व लालित्यपूर्वक वर्णन करून वंदन केले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेच्या प्रारंभी आत्मारूप श्रीगणेशाचे  वर्णन करणारी अलौकिक ओवी लिहिली आहे.

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।

हे विश्वाच्या आदिस्थाना! वेद तुझेच वर्णन करतात. तुझे रूप फक्त तुलाच स्पष्टपणे जाणवते. सर्वव्यापी आत्मरूपी ओंकार तो तूच आहेस. तूच गणपतीरूपाने नटलेला आहेस. हे परमात्मा श्रीगणेशा तू सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश आहेस. संपूर्ण वेद हीच गणपतीची सजविलेली सुंदर मूर्ती आहे. चारही वेद हे श्रीगणेशाचे शरीर. स्मृती हे अवयव. अठरा पुराणे हे अलंकार. पुराणातील सुरेख शब्दरचना हे गणेशाच्या अंगावरील भरजरी वस्त्र होय.

ज्ञानरूप गणेशाचे वर्णन करताना ज्ञानराज म्हणतात- पातंजल दर्शन हा हातातील तुटलेला दात. हेच खंडित बौद्धमत होय. सांख्यशास्त्र हा श्रींचा वरदायक हात होय. धर्मशास्त्र हा अभयहस्त. ब्रह्मसुखाचा आनंद ही सोंड. सुखसंवाद हा शुभ्र दात होय. ज्ञान सूक्ष्म असते ते गणेशाचे बारीक डोळे होय. पूर्व व उत्तर मीमांसा हे दोन सुपासारखे कान होय. द्वैताद्वैत मत हे गंडस्थळे आणि दशोपनिषदे ही गणेशाच्या मुकुटातील दोन सुगंधी फुले होय. ओंकारात तीन मात्रा आहेत त्यात श्रीगणेश सामावलेला आहे.

समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधात श्रीगणेशाचे अत्यंत कलात्मक, अभिनव व लालित्यपूर्वक वर्णन करून वंदन केले आहे. बोधरूप गणेशाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात-

ॐ नमोजि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।

अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ।।

अज्ञानरूप भ्रम दूर करून आत्मज्ञान देणारे सद्गुरू हेच श्रीगणेश आहेत असे संतांचे ठाम मत आहे. जीवनात सद्गुरूंचे प्रकट होणे हीच श्रीगणेशकृपा. सद्गुरुप्राप्ती झाल्यावर अज्ञान, अविद्यारूप अंधार दूर होतो. कारण गुरुवचनामृताने शिष्याच्या जीवनात आत्मज्ञान प्रकाश निर्माण होऊन सगळी विघ्ने संकटे दूर होतात. संतांचा गणेश हा केवळ पार्वतीनंदन, शिवतनय, कार्तिकेयाचा बंधू नसून ज्ञानरूप सूर्य आहे. तो सद्गुरूकृपारूपाने शिष्याच्या जीवनात अचानक प्रकट होतो. बोधरूप गणेश अवतरतो. ज्ञानदेवांचा गणेश ज्ञानरूप असून त्यातून वाङ्मयाचे ग्रंथरूप तत्त्वज्ञान, विचारांचे प्रकटीकरण होते. समर्थांचा गणेश अज्ञानरूप भ्रांती दूर करणारा आहे.

श्रीगणेशाचे सगुण रूपाचे लावण्य, सुंदरता, कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून श्रीगणेश जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सारे देव देहभान विसरून तटस्थ होतात. श्रीगणेशाचे रूप भव्यदिव्य असून त्याचा देह अत्यंत विशाल व प्रचंड आहे. भालप्रदेश विस्तीर्ण असून तो सिंदूरचर्चित आहे. समर्थ म्हणतात-

नाना सुगंध परिमळे । थबथबा गळती गंडस्थळे ।

तेथे आली षट्पदकुळे । झुंकारशब्दे ।।

त्याच्या गंडस्थळातून सारखा मदस्राव होत असतो व त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधी परिमळामुळे आकर्षिले जावून भुंग्यांचे थवे मधूर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालतात.

श्रीगणेश चौदा विद्यांचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत. सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहत असतो. श्रीगणेशाचे कान खूप मोठे आहेत. ते दोन सुपासारखे कान तो सतत हलवत असतो तेव्हा त्याचा फडफड आवाज येतो. समर्थ म्हणतात-

चौदा विद्यांचा गोसावी । हरस्व लोचन ते हिलावी ।

लवलवित फडकावी । फडै फडै कर्ण थापा ।।

श्रीगणेशाच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यात जडविलेली आहेत असा रत्नजडित सुवर्णमुकुट आहे. त्यातून अनेक रंगी प्रकाशकिरणे फाकतात. त्या अपूर्व झळाळीप्रमाणे कानात नीलमण्यांची कुंडले झगमगतात.

श्रीगणेशाच्या शूभ्र दातांप्रमाणेच त्याचे पोट लवलवीत व सारखे हलत असते. त्यावर सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोटय़ा छोटय़ा घुंगरांचा आवाज मंदमधुर असतो.

समर्थ म्हणतात-

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।

गमू पंथ आनंत या राघवाचा ।।

श्रीगणेश हा गणांचा स्वामी आहे तसाच सर्व गुणांचाही अधिपती आहे. निर्गुणांचा तो मूळ आहे. गणाधीश म्हणजे शिवगणांचा किंवा शरीर इंद्रियगणांचा स्वामी असा लौकिक अर्थ आहे. गणेश गुणांचा जनक व नियंता आहे. षड्गुणऐश्वर्ययुक्त अशा भगवंताप्रमाणेच श्रीगणेशही गुणाधिपती आहे. प्रकृतीचा नियंता, त्रिगुणात्मक मूळ मायेचा गुणाधीश श्रीगणेश आहे.

श्रीगुरुचरित्रात सरस्वती गंगाधर स्वामींनी श्रीगणेशाचे स्तवन केले आहे.

ॐ नमो जी विघ्नहरा । गजानना गिरीजाकुमरा ।

जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ।।

हे श्रीगणेशा, तू तुझे सुपासारखे मोठे दोन कान हलवितोस त्यामुळे तेथून जो वारा उसळतो त्या प्रचंड वाऱ्यामुळे सगळी विघ्ने पळतात म्हणून तुला विघ्नांतक म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे तेजस्वी असे तुझे मुख शोभून दिसते. तू विघ्नांची जंगले तोडण्यासाठी हाती परशू घेतला आहेस. कमरेस नागबंद शोभत असून तो पवित्र यज्ञोपवित तू धारण केला.

विघ्नकाननछेदनासी । हाती फरश धरिलासी ।

नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ।।

हे श्रीगणेशा तू उत्तम लेखनकर्ता आहेस. चौदा विद्यांचे आपण स्वामी आहात. महाभारत, भागवत, पुराणे यांचे आपण लेखन केले आहे. त्यासाठी ब्रह्मादिक देवादिकांनी तुझे स्तवन, चिंतन केले आहे. तसेच आपण दैत्यांचे संहारही केले आहे. सर्व देवदेवता कार्यारंभी तुझे स्तवन करतात. विघ्ने दूर करून सर्व विश्वाचे तू प्रतिपालन करतोस. ज्ञानराज, समर्थ, सरस्वती गंगाधरांप्रमाणे संत नामदेवांनीही श्रीगणेशस्तवन केले आहे.

लंबोदरा तुज शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।

हे श्रीगणेशा तुझ्या चारही हातात शस्त्रs शोभून दिसतात. तू भक्तांचे रक्षण करतोस. तुझे रूप भव्य असून हे उंदिरवाहना श्रीगणेशा मी तुझ्या चरणांना वंदन करतो. तुझ्या नामस्मरणाने महापातके जळतात.

चौदा विद्या तुझे कृपेने येतील ।

मुके बोलतील वेदघोष ।।

भक्तवत्सला ऐके पार्वतीनंदना ।

नमन चरणा करितसे ।।

नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती ।

वर्णितसे कीर्ति कृष्णजीची ।।

श्रीगणेशा तू सकळकार्यांचा आधार आहेस. तू कृपासागर आहेस. गौरीकुमारा मज मतिहीनाला तू ज्ञानप्रकाश कर!

प्रथम नमन करूं गणनाथा । उमाशंकराचिया सुता ।।

चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगी आता दंडवत ।।