स्मरण आद्य शंकराचार्यांचे

69

 <<नामदेव सदावर्ते>>

पेरियार म्हणजेच पूर्णातटाकी नंबुद्रीपाद ब्राह्मणाच्या कुळात श्री आद्य शंकराचार्यांचा जन्म इ.स. ७८८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीशिवगुरू, आई आर्यांबा. श्रींच्या वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी त्यांचे वडील श्रीशिवगुरू कालवश झाले. त्यानंतर आईने त्यांना वाढविले.

आद्य शंकराचार्यांनी वेदविद्या शिकण्यासाठी नर्मदा नदीच्या तीरावर वस्ती केली. गोविंदगुरूंकडे अध्ययन करून गुरूंच्या हस्ते संन्यासदीक्षा घेतली. नंतर श्रीक्षेत्र काशी येथे निवास करून विविध स्तोत्रे व महान अध्यात्म ग्रंथांची रचना केली. सोळाव्या वर्षी श्रीक्षेत्र काशीचा त्याग करून हिंदुस्थान परिभ्रमणाला प्रारंभ केला.

प्रयाग, नर्मदा, श्रीशैल, गोकर्ण, हरिहर असे मुक्काम करीत करीत शृंगेरी येथे नदीकाठी आले, तेथे संध्यावंदन करीत असताना समोरच्या तीरावर त्यांना एक अपूर्व दृश्य दिसले. एक बेडकी प्रसवत होती आणि तिला सूर्याच्या तळपत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एका सर्पाने फणा पसरून तिच्यावर सावली धरली आहे. वास्तविक, साप व बेडूक एकमेकांचे जन्मजात वैरी. पण तेही एकमेकांचे प्रेममूलक सांभाळ करताना ज्या भूमीवर दिसले ती निर्वैध भूमी आहे, पुण्यभू आहे, क्रतींना तपःसाधनेसाठी अगदी सूयोग्य भूमी आहे याबद्दल शंकराचार्य निःशंक झाले. बारा वर्षे त्यांनी तंतुगिरी व शृंगेरीच्या रानावनात तपःसाधना केली. ग्रंथलेखन व अनेक स्तोत्रांची रचना केली.

याच शृंगेरीत असताना त्यांना एक दृष्टांत झाला की, आपली आई कालडी येथे शेवटच्या घटका मोजीत आहे. श्रींनी त्वरित उठून कालडीला जाऊन आईला वंदन केले. आईने त्यांना विचारले, इतकी वर्षे काय केलेस? त्यावर आद्य शंकराचार्यांनी उत्तर दिले, जगात सर्वत्र अद्वैत आहे. आपली कल्पना आहे त्यापेक्षा आपण फार मोठे आहोत आणि फक्त ब्रह्म तेवढे सत्य आहे. असा त्रिशाखी सिद्धांत मांडणारी ग्रंथरचना करीत होतो.

त्यावर आईने विचारले, अद्वैत म्हणजे काय? शंकराचार्यांनी प्रयत्नपूर्वक नानाप्रकारे अद्वैत म्हणजे काय ते समजून सांगितले, पण मातेला प्रमेयांचे नीट आकलन होईना. गूढ वाढत गेले. अवधी थोडा होता म्हणून ते प्रकरण संपवून त्यांनी केवळ आईच्या कानी पडावे म्हणून तिथल्या तिथे श्रीविष्णू, भुजंग हे स्तोत्र रचलं आणि म्हणून दाखविले. मातेला त्यामुळे परमसंतोष झाला. पोटच्या मुलाच्या तोंडून देवाचे नामस्मरण ऐकता ऐकताच तिने डोळे मिटले. पोथीनिष्ठ ब्राह्मणांचा विरोध पत्करून शंकराचार्यांनी आईच्या पार्थिव देहाला मंत्राग्नी दिला. त्या ठिकाणी दीपस्मृतिस्तंभ उभारला आणि नंतर जन्मगावाचा कायमचा त्याग केला. यावेळी ते फक्त अठ्ठावीस वर्षांचे होते.

आईच्या मृत्यूनंतर आद्य शंकराचार्यांची दिग्विजय यात्रा सुरू झाली. प्रथम शृंगेरीच्या साधकाश्रमाचे रूपांतर कर्मनिष्ठ ज्ञानपीठात केलं. श्रीचक्र मांडून ब्रह्मविद्यास्वरूपिणी देवी शरदांबेच्या लाकडी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्तरेत वादात हरलेल्या आणि नंतर शिष्यत्व स्वीकारलेल्या मंडनमिश्रांचे ‘सुरेश्वचार्य’ असे नामांतर करून शृंगेरीच्या ब्रह्मपीठाचे पहिले सर्वोच्च संन्याशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. सर्व अपरिवर्तनीय वैदिक धर्माधिकार त्यांच्याकडे सुपूर्द केले.

अखेरची पाच वर्षे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सोनेरी कालखंड मानावा लागेल. त्यांनी दूरदृष्टीने देशाच्या चार दिशेच्या कोपऱ्यात अद्वैताची पताका फडफडती ठेवण्यासाठी चार धर्ममठ स्थापन केले आणि कर्नाटकात जन्मलेल्या संन्याशी शिष्य हस्तामलक याला पूर्वेस जगन्नाथपुरीला स्थापन केलेल्या गोवर्धन मठाचे धर्माधिकारी म्हणून नेमले. पश्चिमेस द्वारकेला शारदा मठ स्थापन केला. कावेरी तीरी जन्मलेल्या पद्मनाथ या संन्याशी शिष्याला त्या धर्मपीठाचे सर्व धर्माधिकार दिले. उत्तरेत बद्रिनाथला ज्योर्तिमठ स्थापून तिथे शृंगेरीला जन्मलेल्या तोटकाचार्याला धर्माधिकारी म्हणून नेमले. दक्षिणेतील शृंगेरी मठाला दक्षिणायन्मठ म्हणतात.

या चार धर्मपीठाच्या मठांना चार बोधवचने दिलेली आहे. या चारही मठांची चार बोधवचनं महावाक्ये मानतात. ही चार महावाक्ये हिंदू धर्माचे सार मानतात. वेदातील साऱ्या तत्त्वज्ञानाचा अर्क या चार महावाक्यांत साठविलेला आहे. ही चार महावाक्ये हिंदू धर्मातील तेजस्वी पताका आहेत. हिंदुस्थानातील चार दिशेला ही महावाक्यपताका फडफडत आहेत.

अवघ्या बत्तिसाव्या वर्षी या परमहंस परिक्राजकाने हिमालयातील केदारनाथ येथे ज्योतिर्लिंग मंदिराजवळ शांत चिरनिद्रा घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या