एल्फिन्स्टन रोडचे प्रभादेवी झाले! शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

29

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या वैभवाचे साक्षीदार असलेल्या 300 वर्षे प्राचीन प्रभादेवी मंदिराच्या नावानेच येथील रेल्वे स्टेशन ओळखले जावे. तेव्हा एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात यावे या शिवसेनेने दोन दशकांपासून लावून धरलेल्या मागणीला अखेर यश आले असून केंद्राने दिलेल्या मान्यतेनंतर एलफिन्स्टन रोडचे नामकरण प्रभादेवी झाल्याचे पत्रच रेल्वेने आज काढले आहे.

एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बदलण्याचा ठराव 1991 साली मुंबई महापालिका सभागृहात सत्ताधारी शिवसेनेने आणला. शिवसेना नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते हे महापौर असताना करण्यात आलेला हा ठराव एकमताने मंजूर झाला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनांतही शिवसेनेने यासाठी वारंवार आवाज उठवला. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनीही हा विषय अधिवेशनात लावून धरला. अखेर याला राज्य सरकारच्या मंजुरीनंतर केंद्रात गेलेल्या या प्रस्तावाला केंद्राने हिरवा कंदील दाखवला. आज रेल्वेने तसे परिपत्रक काढत एलफिन्स्टन रोडचे प्रभादेवी असे नामकरण झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रभादेवी स्टेशनसाठी रेल्वेने कोडही ठरवला असून नकीन कोड इनिशिअल पीबीएचडी (PBHD) असा असणार आहे.

12 जुलै रोजी हा नामांतर सोहळा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या