लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे फॉर्म सातच्या माध्यमातून वगळली जात आहेत. प्रत्येक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अडीच ते दहा हजार मतदारांची नावे वगळली जात असल्याचा गंभीर आरोप आज महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला. नावे वगळण्याच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा घणाघाती आरोपही यावेळी करण्यात आला.
महायुतीचे नेते फॉर्म सातच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे मतदारयादीतून वगळत असल्याची तक्रार आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोग मोदी-शहा यांच्या इशाऱयावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, कार्याध्यक्ष नसीन खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे उपस्थित होते.
मतदान पारदर्शक व्हावे
शिवसेना खासदार अनिल देसाई यावेळी म्हणाले की, 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरातच मतदान करू देण्याचा निर्णय योग्य आहे, पण त्यात पारदर्शकता असली पाहिजे. हे मतदान होताना सर्व पक्षांचे बूथ पातळीवरील प्रतिनिधी असल्याशिवाय मतदान घेऊ नये. जागरूकतेने मतदानाचा हक्क बजावावा, कोणाच्याही दबावाखाली मतदान होऊ नये. मुंबईत प्रत्येक मतदारसंघात 4 हजार 500 असे ज्येष्ठ मतदार आहेत, तर इतर शहरांत ते 6 हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हे मतदान योग्य पद्धतीने व पारदर्शक झाले पाहिजे.