नामिबियातून आलेली ‘आशा’ गर्भवती झाली

जवळपास 70 वर्षानंतर हिंदुस्थानात पुन्हा चित्ते आले आहेत. हे चित्ते नामिबियातून आणण्यात आले असून ते बघण्यासाठी लोकं खूप उत्सुक आहेत. या चित्त्त्यांची एक झलक बघायला मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. देशात चित्त्यांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असून याला यश मिळताना दिसायला लागले आहे. नामिबियातून आलेल्या चित्त्यांमध्ये 3 मादी आणि 5 नर चित्ते आहेत. यातली आशा नावाचा मादी चित्ता गर्भवती आहे. यामुळे हिंदुस्थानातील चित्त्यांची संख्या वाढेल अशी आशा पल्लवित झाली आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांवर बारीक नजर ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते आशा चित्त्यावर विशेष नजर ठेवून आहेते. तिच्या व्यवहारात बदल दिसत असून शारिरीक आणि हार्मोनल बदल ‘आशा’ गर्भवती असल्याचे संकेत देत आहेत. ही बातमी उत्साहीत करणारी असली तरी आशा चित्ता गर्भवती असल्याची खात्री पटण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 17 सप्टेंबरला हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 8 चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर या चित्त्यांच्या प्रकृतीवर आणि हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होतं.