राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा आणि काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल भाजपात

876

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतः बीडमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केजमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून नमिता मुंदडा  यांना तिकीट जाहीर केले होते मात्र त्यांनी ऐनवेळी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर गोंदिया जिह्यातील काँग्रेसचे नेते, विधीमंडळातील लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि गोंदियाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांनी एका समारंभात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

मुंदडा यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ई-मेलद्वारे पाठविला. राजीनामा देताच अवघ्या काही तासांत नमिता यांनी गोपीनाथ गडावर दाखल होऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश  केला. मुंदडांचा भाजप प्रवेश  जिल्हा राष्ट्रवादी आणि स्वतः पवारांनाही मोठा हादरा मानला जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गोपालदास अग्रवाल गेल्या पाच वर्षात शरीराने नसले तरी मनाने भाजपतच होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आघाडी सरकारच्या काळातील अनेक स्फोटक प्रकरणे शोधली आणि ती विधीमंडळाच्या पटलावर आणली. त्याचा राज्य कारभार सुधारण्यास निश्चितच फायदा झाला. अडचणीच्या काळात अग्रवाल यांनी आम्हाला साथ दिली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की 2014 मध्ये ज्यावेळी शिवसेनेचा पाठिंबा या सरकारला मिळायचा होता आणि सरकार काहीसे अस्थिर होते त्यावेळी गोपालदास यांनी मला भेटून सांगितले होते की विदर्भाचा एक माणूस मुख्यमंत्री बनतो आहे याचा मला आनंद आहे आणि जरूर असेल तर मला सांगा मी राजीनामा देऊन तुमच्या पक्षात येऊन पुन्हा निवडणूक लढवतो. मात्र मी त्यांना त्यावेळी थांबवले असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या