`नाना’ महाराजांचे दत्त संप्रदायातील योगदान

(अध्यात्म –  रविंद्र वडनेरकर, अखिल भारतीय त्रिपदी परिवार (इन्दौर) मुंबई विभाग, मुंबई)

भक्तवत्सल चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज तराणेकर हे मूळचे मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र तराणा येथील व नंतरच्या काळात ते इन्दौर येथे रहायला गेले. दत्तात्रय परंपरेतील (तृतीय अवतार) प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचा अनुग्रह वयाच्या बाराव्या वर्षी प्राप्त झालेले शिष्योत्तम स्वरूपातील परम सद्गुरू नाना महाराज हेदेखील दत्तस्वरूप समजून अवतार परंपरेतील दत्तावतार मानले जातात. पाच सर्वोत्तम शिष्यांपैकी एक असलेले व ९७ वर्षांचे आयुष्य लाभलेले प.पू. नाना महाराज यांचे संपूर्ण जीवन चैतन्याने भारलेले, आपल्या भक्ताला यथार्थ मार्गदर्शन करणारे, अंतिमत: जीवन साफल्याचे फळ देणारे असून ते भक्तवत्सल परमहंस आहेत.

पूर्वजांना इन्दौरच्या होळकर संस्थानाकडून घर, शेतजमीन व धर्माधिकारी पद मिळाले. पूर्वजांपासून त्यांचे येथे असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. श्रीदत्त भक्तीचा सात्विक वेळ लावून श्रीक्षेत्र उज्जैनला ते गेले. तेथे त्यांनी चार्तुमास केला. प.पू. नानांचे वडील शंकरशास्त्री यांनी स्वामींचा अनुग्रह उज्जैन येथे घेतला. बालवयातील नाव मार्तंड पण कौतुकाने ‘नाना’ म्हणत. तेच नाव सार्थ झाले. प.पू. नाना ५-६ वर्षांचे असताना स्वामींचा चार्तुमास तराणा येथे झाला. हक्काने स्वामींच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या बाळ मार्तंडला स्वामी स्वहस्ताने बेदाणा, मनुकांचा प्रसाद भरवीत. पुढे शालेय शिक्षण सुरू असताना मुख्य गुरुजींनीच खोटे बोलण्यास केलेल्या आग्रहाची चीड येऊन त्यांनी शाळा कायमची सोडली. घरच्या वेदशाळेत वेदाभ्यास वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, मौजीबंधनानंतर व गायत्री उपासनेनंतर पुढील वेदाभ्यास इन्दौर येथे नरहरशास्त्री यांच्या येथे झाला. प्रखर बुद्धीच्या जोरावर प्रारंभापासून वेदविद्येत ते पारंगत झाले.

तपोबलाने आर्तभक्तीमुळे प.पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज ब्रह्मावर्ताहून चार्तुमासात व्यग्र असतानाही वायुवेगाने येऊन बाळ मार्तंडला अनुग्रह दिला. ‘तू दत्ताचे लाडके लेकरू, समाधीत न रमता, दत्तभक्तांना सुलभ सोपा मार्ग दाखवून जनजागृतीचे मोठे काम तुला करावयाचे आहे, असे सांगून अंतर्धान पावले. त्यापूर्वी आपली छाटी पांघरून व चैतन्यमयी मंत्राक्षरे नानांच्या कानात सांगितली. तो गुरुमंत्राचा दिवस होता मंगळवार त्रिपुरारी पौर्णिमा (कार्तिक शु. पौर्णिमा), दि. २२-११-१९०४

परमपूज्य नानामहाराजांनी त्यांच्या तरुणपणात अनेक तीर्थयात्रा केल्या. तसेच नर्मदा परिक्रमा, चारधाम, गिरनार यात्रा, हिमालयातील अनेक ठिकाणी जिथे ऋषीमुनी वास्तव्य करतात त्या ठिकाणी त्यांनी अवघड यात्रा केल्या. जेथे त्यांना महाभारतातील ऋषीमुनींचे दर्शन झाले. त्यांचे आवडते स्थान  श्री क्षेत्र गाणगापूर. येथील संगमाच्या समोरच १९८३-८४ साली स्वत:च्या देखरेखीखाली मोठी धर्मशाळा बांधली. त्या काळात भक्तांना संगमावर पारायण व इतर साधना करण्यासाठी शांत असे ठिकाण नव्हते. हे पाहून परमपूज्य नाना महाराजांनी भक्तांसाठी ‘साधना भवन’ ही वास्तू निर्माण केली. सन १९८४ साली प.पू. नारायण महाराज यांचे यतीपूजन झाले. प.पू. नारायण महाराजांनी त्यांच्या जीवनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील विविध ठिकाणी ३२ मोठे यज्ञ केले. त्यादृष्टीने ते महान योगीच होते. यज्ञ यागातील त्यांचे मार्गदर्शन  व सिद्धता पाहून विद्वान पंडितही नतमस्तक होत होते. यज्ञांमध्ये काही ठिकाणी पशूंना बळी दिला जात असे. ही प्रथा महाराजांनी बंद केली.

ज्योतिषशास्तत्रात ते पारंगत होतेच. तसेच संगीत शास्त्रातही त्यांचे मार्गदर्शन मोठे कलाकार घेत असत. पं. कुमार गंधर्व, प. प्रभाकर कारेकर, पं. सी. आर. व्यास तसेच पं. अजित कडकडे, सौ. आशाताई खाडिलकर अशी दिग्गज मंडळी नानांपुढे आपली कला सादर करीत असत. त्यांना नेहमी वाटे की बालमनावर बालवयातच चांगले संस्कार झाले पाहिजेत व आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या अनेक मुलांच्या मुंजी त्यांनी स्वत: लावल्या. नाना महाराजांचे खास वैशिष्टय़ म्हणजे सात्विक, राजस व तामस याचा संबंध त्यांनी अन्न, यज्ञ व दान याच्याशी जोडला. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित करुणात्रिपदी या भक्तीप्रद प्रार्थनेचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. सामूहिक त्रिपदी प्रार्थनेचे ते जनक समजले जातात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नानांची कीर्ती ऐकून त्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले होते.

मुंबई नगरीवर त्यांचे अपार प्रेम होते. त्यामुळे त्यांचा मुक्काम मुंबईत नेहमीच जास्त दिवस विविध भक्तांकडे असे. प.पू. नाना महाराजांनी मुंबईत दत्त महाराज कविश्वर यांजकडून भगवत सप्ताह करवून घेतला. त्यांचे इतरही लहानमोठे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. नाना महाराजांच्या पुढच्या पिढीतील कुटुंबीयांनी आपले सर्व आयुष्य ज्याप्रमाणे नानांनी खर्च केले त्याचप्रमाणे त्यांच्या सूनबाई वहिनीसाहेब त्यांचे चिरंजीव डॉ. प.पू. बाबासाहेब तराणेकर हे त्यांचे कार्य करीत आहेत. सर्व हिंदुस्थानात परदेशी त्रिपदी परिवाराच्या १५० शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये निरनिराळे समाजोपयोगी ३५ प्रकल्पही चालू आहेत. मुंबई त्रिपदी परिवारात एका भक्ताने विलेपारले येथे प.पू. नाना महाराजांच्याच मार्गदर्शन व आशीर्वादामुळे नाना महाराज स्मृती सभागृह उभे राहिले आहे. त्याचा पत्ता लक्ष्मी गोविंद सदन, ब्राह्मण वाडा, बँक ऑफ बडोदा सोसायटीच्या मागे, विलेपारले (पूर्व), मुंबई – ९९ असा आहे. वर्षाचे चारही उत्सव या ठिकाणी संपन्न होतात.

प.पू. नाना महाराज यांना ब्रह्मलीन होऊन २०१८  साली २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने  २०१७, २१ एप्रिल रोजीपासून पूर्ण वर्षभर, हिंदुस्थानात विविध कार्यक्रम होणार आहेत. वैश्विक वाटचालीकडे त्रिपदी परिवार द्रुतगतीने मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव विलक्षण असणार आहे. मुंबई विभाग त्रिपदी परिवाराच्या गुरुबंधू भगिनी तसेच दत्तसंप्रदाय मंडळी व हितचिंतकांच्या सहकार्याने शारदाश्रम विद्यालय, डॉ. भवानी शंकर मार्ग, दादर पश्चिम येथे नाना महाराज स्मृती उत्सव दि. २९ जानेवारी २०१७ रोजी वार्षिक उत्सव पार पडत आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या